पारंपरिक ज्ञान व लोकसंग्रहातील अनुभवजन्य माहितीवर आधारित या रानमेव्याचे गुण व वैशिष्टय़ांची माहिती ही चांगलीच पसरू लागलीय व याचं श्रेष्ठत्वही पटू लागलंय. पचनविकार दूर करणारी विचरीची भाजी, आतडय़ाची गती (cysiolic movement) सुधारून मुळव्याधीपासून बचाव करणारी केणी, घोळ, चिवी व कवळी हरितद्रव्य भरपूर असलेली, रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी बापली, मूत्रविकारग्रस्तांसाठी कुर्डू (पानं व बियासुद्धा), अस्थिभंगावर फायदेशीर वज्रलता, रक्तशुद्धीकारक व त्वचाविकारनाशक उग्र टाकळा, त्याच्या बलकारक बिया, मधुमेही/प्रमेही लोकांना उपकारक करटोळी (कंटोळी), पंडुरोग्यांसाठी गोवल, मज्जातंतूंना बळकटी आणणारी सुवर्णतत्त्वयुक्त कोरल, याशिवाय तेलपट, खुरासनी, फोडशी, शेवळी, गाबोळी, खोकली, कारिवणा, अबय, आघाडा, कांचन व हादग्याची फुलं, भारंगी व भांगरा, याशिवाय घोमेटी, ससेकंद, कांदफळे, भुरमुळे, करांदे, कणगं.. अगणित अशा शुद्ध, स्वस्त, नैसर्गिक, खरोखरीच्या सेंद्रीय व पूर्णपणे निर्धोक अशा भरपूर पोषकतत्त्वे व ३० पेक्षा जास्त सूक्ष्म घटकांची पूर्तता करणारे खनिजं, जीवनसत्त्व व प्रथिनांचा अमर्याद खजिनाच जणू! या सर्व अँटिऑक्सिडंट, रोगप्रतिरोध क्षमता वाढविणाऱ्या, ऊर्जेचा स्रोत अशा अद्भुत गुणांनी युक्त, पण कोलेस्ट्रॉल वा स्निग्ध पदार्थ नसणाऱ्या अशा आहेत. शरीरातील (Toxins) विषद्रव्यं व रक्तातील अनावश्यक घटक बाहेर फेकणं अपायकारक सूक्ष्म जंतूंशी सामना करणं व त्यांना निष्प्रभ करणं यासाठी निसर्गानं त्यांची योजना केलीय. या सर्व जंगलातल्या दुर्लभ प्रकारांना आता माणसाळवून घरात वाढवणं सहज शक्य आहे. हे सर्व भाज्यांचे प्रकार आपल्या घरी वाढविण्याच्या/ लावण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत अतिशय सोपी, साधी अशी असून त्यात फक्त घरी असलेल्या कुंडय़ातील झाडांच्या अवतीभवती असलेल्या मोकळ्या जागेतील माती उकरून त्यात कंपोस्टयुक्त माती मिसळून रानभाज्यांचे बी पेरणे वा कंद वा वेली लावणे ही होय. गाबोळी, घोमेटी, अबय, कंटोली हे वेलप्रकार व कुर्डू, विचरी, कवली वा माका या भाज्या अशा पद्धतीनं वाढवणं सहज शक्य होतं. वेल प्रकारांना कुंडीतल्या मुख्य झाडावर वा बाल्कनीतील ग्रीलवरती (उन्हात अति गरम होत नसल्यास) वा थोडाफार आधार देऊन लावता येते.
http://www.loksatta.com/vastu-lekh-news/forest-vegetable-garden-on-building-balcony-1311398/
http://www.loksatta.com/vastu-lekh-news/forest-vegetable-garden-on-building-balcony-1311398/