तर कधी येऊ भेटायला?

आमचे साहेब तुमची खूप इज्जत करतात आणि तुम्हाला भेटण्याची त्यांची  इच्छा आहे. तुम्हाला कदाचित त्यांच्याविषयी फारशी माहिती नसेल.  म्हणून थोडी ओळख. 

मोठ्या लोकांच्या शिफारसपत्रांच्या आधारावर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्वीच बंदूक बाळगण्याची परवानगी दिली आहे. आजपर्यंत त्यांनी एक-दोन अपवाद वगळता कधीही गोळी झाडलेली नाही. फक्त एकदा एक जण अगदीच अंगावर आला म्हणून स्व- संरक्षणार्थ त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला कायमचे जायबंदी केले आहे. त्यातही एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सरळ डोक्यात किंवा छातीवर गोळी झाडणे शक्य असूनही त्यांनी तसे केले नाही यावरून त्यांची थोरवी लक्षात येते. चर्चा करताना अधे-मधे खिशातील बंदूक काढून तिच्या नळीच्या टोकावर हलकीशी फुंकर मारायची आणि बंदूक परत खिशात ठेवायची अशी त्यांची जुनी सवय आहे. पान खाऊन पचापच थुंकणाऱ्यांच्या सवयीकडे जसे तुम्ही  दुर्लक्ष करता तसे या सवयीकडे दुर्लक्ष करा आणि चर्चा चालू ठेवा.

दुर्गादेवीचे आणि महालक्ष्मीचे उपासक जसे महत्त्वाचे तसेच सरस्वतीचे उपासकही महत्त्वाचे आहेत असा त्यांचा दृष्टीकोन आहे. तुमच्यासारख्या अनुभवी आणि ज्ञानी व्यक्तीबरोबर चर्चा करायला त्यांना फार म्हणजे फारच आवडते. तुम्हाला कदाचित आवडत नसेल याची त्यांना कल्पना आहे. पण तुमच्या आगामी पुस्तकाच्या काही शे प्रती आगाऊ रक्कम देवून विकत  घेतल्या तर त्यांना भेटण्याची इच्छा तुमच्यामध्ये आपोआप जागृत होईल हेही त्यांना माहीत आहे. माहिती जमा करून तिचा यथायोग्य उपयोग करणे हे ऍमेझॉन आणि गूगल देखील करते. त्यांच्यावर कोणी ब्लॅकमेलिंगचा आरोप करत नाही. साहेबांवर मात्र खोट्या केसेस दाखल करून विनाकारण मनस्ताप देणारे हितशत्रू आजूबाजूलाच आहेत. पण त्यांना पुरून उरलेले साहेब अजून बाहेर आहेत आणि ते "आत” जाण्याची काहीही शक्यता नाही  ही  गोष्ट  हायकोर्टाला देखील माहीत आहे.

बोलण्याचा भरात थोडी जास्तच माहिती दिली. खरं तर त्याची काही गरज नव्हती.  तुमच्यासारखी लोकं नुसत्या एका निरोपावर भेटायला येतात. तेव्हा साहेब स्वतः खाली उतरून एखाद्याला भेटायला जातात म्हणजे एक आश्चर्यच आहे. पण त्यातही त्यांचा काही विचार असेलच. परिसराची रेकी करायची, घरच्यांशी घसट वाढवायची, शेजारी-पाजारी संपर्क ठेवायचा ही कामे पंटर लोकांवर सोपविता येत  नाहीत. 

तर कधी येऊ देत भेटायला?