कोलाज - अमेरिकेच्या अंतरंगाचा
संपादकः
डॉ. लतिका भानुशाली
डॉ. गजानन सबनीस
लेख: डॉ. भूषण केळकर ( पान १८० आणि १८१)
तिथे 'आवश्यक' या सदरात मोडणाऱ्या गोष्टी इथे 'लक्झरी' या सदरात मोडतात. इथे कामातील चालढकल, नवीन गोष्ट शिकण्यामागची अनुत्सुकता, 'काय फरक पडतो' ही प्रवृत्ती या मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत.
परदेशातील आणि विशेषतः अमेरिकेतील वास्तव्याचा लेखाजोखा मांडायचा म्हटला तर अमेरिकेत काय कमावलं ही यादी खरंच मोठी आहे। श्रमप्रतिष्ठा, देशाभिमान, कुतूहल असलं तरीही दुसऱ्याच्या जीवनात 'भोचकपणा' न करण्याचं सौहार्द, स्वतःच्या स्वातंत्र्याबरोबरच दुसऱ्याचेही स्वातंत्र्य मानण्याची वृत्ती, कामाप्रती उत्तरदायित्व, दिलेला शब्द पाळणं हे प्रमुख ! व्यावहारिक-वैयक्तिक पातळीवर आर्थिक संपन्नता-स्यैवं, अनुभवसंपन्नता आणि निःसंशयपणे जागतिक दृष्टिकोन !
अमेरिकेतील वास्तव्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या गमावल्या त्यात पहिलं म्हणजे आई-वडील व बहीण यांसोबतची १५ वर्षे; जी हानी कधीच भरून निघणार नाही. दुसरं म्हणजे १९९१ ते २००५ पर्यंत आर्थिकी उदारीकरणामुळे भारत ज्या ऐतिहासिक संक्रमणातून जात होता त्यात प्रत्यक्ष सहभाग घेता न आल्याची खंत!
भारतात परत येऊन काय गमावलं ? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती ! (अर्थात 'निष्काम कर्मयोगाचे फुकट धडे' ही त्याची जमेची बाजू!) खरोखरच सामान्य असणाऱ्या (लायसन्स, गॅस, लाइट, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, सर्वांची लाडकी KYC...!) गोष्टीतील अनाकलनीय क्लिष्टता, दिरंगाई, बेमुर्वतखोरपणा, त्यात 'दुष्काळात तेरावा' म्हणून जात-पात-धर्म या विषमतेच्या वल्लीवर उभी असणारी संवेदनाशून्य सरकारी यंत्रणा - त्यामुळे बोकाळलेली 'चलता है', 'मला काय त्याचे' ही बेपर्वा समाजव्यवस्था आणि या सर्वातून एकसमयावच्छेदेकरून उभरणारी निराशा जी निष्क्रियतेला खतपाणी घालते त्यामुळे नवनिर्मितीच्या ऊर्मीला पडलेली खीळ!
भारतात येऊन काय कमावलं, याची यादी पण उपर्युक्त कारणांमुळेच, केवळ टीका करत न बसता ते बदलता कसे येईल याचा आपल्या परीने जीव ओतून यशापयशाची क्षिती न बाळगता, ठाम निर्धाराने काम करत राहण्याच्या प्रयत्नवादाने सुरू होते आणि त्यानेच संपते!
१८० / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगाचा
मला खरंच वाटतं की अमेरिकेकडून बर्गर घेण्यापेक्षा तेथील श्रमप्रतिष्ठा प्यावी! इथे देवी स्वरूपातील पूजन करता करता 'निर्भया' घडते अन् त्यानंतर संवेदनाशून्य भाष्ये घडतात. यापेक्षा अमेरिकेतील (तुलनेने) स्त्रियांचे सन्माननीय स्थान घ्यावे! जेमतेम ४०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या त्या देशाकडून, त्यापेक्षा कित्येक पट देदीप्यमान इतिहास असणाऱ्या भारताने, डोळस अभिमान शिकावा! जात-पात-पंथ यात शकले झाल्याने एकेकाळची सुवर्णभूमी भारत, इस्लामी अन् इंग्रज आक्रमकांकडून कशी बलात्कारीत झाली हे समजूत घ्यावे! त्या गेल्या सहस्रकाची काजळी आपण प्रखर राष्ट्रवादाने पुसून, कसे पुरून उरू शकतो हे अमेरिकेकडून शिकावे! आणि हे शिकू शकू की 'कृण्वन्तो विश्वम् आर्यम्' अथवा 'अवघे विश्वचि माझे घर' हा भारताचा मूलभूत हुंकार आपण स्पष्टपणे उमटवू शकतो, हा विचार महत्त्वाचा आहे.
हवी आहे ती गतानुगतिकाची मरगळ झटकून, हा शतखंडित समाज एकदिलाने उभा राहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ! हवी आहे ती इतिहासाचे अगतिक दास न होता 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' ही वृत्ती सोडण्याची दुर्धर जिजिविषा !! हवी आहे भूतकाळात अडकून न पडता, विज्ञान अन् नाविन्याची कास धरत, नवचैतन्याने उजळून जाऊन, भविष्याचे कर्तुमकर्तुम स्वामी होण्याची प्रखर विजिगीषु मनोधारणा !!!
मुलाखतकार - लतिका भानुशाली / गजानन सबनीस
शब्दांकन : लतिका भानुशली
_____
लेखकः प्रशांत कर्हाडे (पान २०४ ते २०७)
माझ्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे, एकंदरीत अमेरिकेतील लोक आयुष्याकडे कसे बघतात, कसे जगतात याविषयी कळले. आता गेली बारा वर्षे मी भारतात आहे पण अमेरिकेविषयीचे विचार सतत माझ्या मनात येतात आणि त्याची तुलना भारताशी करतो. कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
अमेरिकन लोक मुळातच शिस्तप्रिय व नियमांचे पालन करणारे आहेत. माझ्यामते बहुतेक अमेरिकन हे प्रामाणिक असतात. आयुष्य हे ठराविक पद्धतीनेच जगले पाहिजे अशी त्यांची धारणा नसते. प्रत्येक अमेरिकनला एक भले मोठे घर, ज्यात कमीतकमी तीन बेडरूम्स्, दोन गाड्या, त्या पार्क करायला गॅरेज असावे असे वाटते. प्रत्येक मार्ग हा "बरोबरच" हे ते जाणतात. अमेरिकन तुम्हाला नेहमी असं विचारताना आढळतील. तुला काय आवडते? काय आवडत नाही? किंवा तू काय चांगले करू शकतोस? किंवा याबाबतीत तुझं काय मत आहे? या प्रश्नांमध्ये त्याचा जोर "तू" या शब्दावर असतो. अगदी लहान मुलांनाही असे प्रश्न विचारले जातात. ज्यामुळे त्यांचा आत्मसन्मान व व्यक्तिविशेष (इंडिव्हिज्युएलिटी) जोपासले जातात "यंग अॅडल्ट" हा शब्द मला खूप आवडतो. मला खात्री आहे की हा शब्द अमेरिकन मंडळींनीच शोधून काढला असणार.
याउलट बहुतेक भारतीय मंडळी, आपली रोजीरोटी कमविण्यात व्यस्त असतात. मग नवीन शोध लावण्यासाठी व वर्चस्व मिळविण्यासाठी वेळच कुठे आहे? पण आश्चर्य याचे वाटते की ज्या लोकांकडे अमाप पैसा आहे, त्यांनी सुद्धा नवीन शोध नाही लावले. टाटा मोटर्स कित्येक दशकांपासून ट्रक्स बनवत आहेत. त्यात काही नाविन्यपूर्ण सुधारणा करून डबल फ्युएल एफिशन्सी ट्रक्स का बनवले नाहीत? मोठमोठ्या इंडियन आयटी कंपन्या, त्यांच्या सर्व्हिसेस, परदेशी कंपन्यांना देऊन, सुस्थितीत आहेत. पण कोणी आयपॉड किंवा फेसबुक बनविण्याचा विचार का केला नाही?
२०४ / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगाचा
मला वाटतं अमेरिकन्स नेमके यातच वेगळे आहेत. नाविन्याचा शोध घेण्यासाठी, धोका पत्करण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात आहे. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. जेव्हा केव्हा काही "वेडे" यशस्वी होतात, तेव्हा ते आपल्या सहकाऱ्यांना व समाजाला भरभरून दान देतात. त्यामुळे अजून बरेच "वेडे" तयार होतात. सुजनतेला मदत करण्यासाठी एक अख्खी इकोसिस्टिम अमेरिकेत आहे. म्हणून ते जगावर राज्य करतात.
अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवला व अवकाश जिंकले. त्यांनी सेमीकंडक्टर्स, कॉम्प्युटर्स, मोबाईल शोधून काढले. नवनव्या क्रांतीकारक, एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजीजही शोधून काढत आहेत. थोडक्यात काय ते आज जगावर राज्य करत आहेत आणि अजून काही शतकेही तसंच करत रहाणार.
अमेरिकन लोक "गुड डील-बॅड डील" या चक्रव्यूहात अडकले आहेत आणि गुड डील आहे म्हणून किंवा आपल्या खिशाला परवडतं म्हणून कुठली गोष्ट न घेता, त्याची गरज आपल्याला आहे का? हा साधा, सोपा विचार करण्याची क्षमता गमावून बसले आहेत.
त्यांचे खाद्यसंस्कृतीवरील प्रेम पाहून, आपले मन सुन्न होऊन जाते. अमेरिकेमध्ये जेव्हा मी प्रथम तेथील सॉफ्ट ड्रिंकच्या कपाचा साइज बघितला, तेव्हा अवाक् झालो. यामुळेच अमेरिकन लोक गलेलठ्ठ होत चालले आहेत. अतिसमृद्धीचा हा विकार अमेरिकन लोकांमध्ये झपाट्याने पसरत चालला आहे. काही वेळा अशा या गलेलठ्ठ लोकांकडे मी आवासून बघत असे, तेव्हा ते माझ्याकडे वैतागून पहायचे, मी संकोचून जायचो. हे कमी म्हणून की काय, ते अर्धी चड्डी घालत असत. अमेरिकेत जितके नेत्रसुख मिळू शकते, तितकेच डोळ्यांवर अत्याचारही होऊ शकतात.
केवळ अती खाणे हा एकच मुद्दा नाही तर एक साधारण अमेरिकन एका फास्ट फुड रेस्टॉरंटमध्ये जेवताना जितका कचरा निर्माण करतो, ते फार भयानक आहे. अमेरिकन लोकांचा, वीजेचा दरडोई उपयोग, हा जगात एक नंबरचा आहे. त्यामुळे प्रदूषण करण्यात पण त्यांचा प्रथम क्रमांक लागतो. एकंदरीत विकसित देशातील वीस टक्के लोकसंख्या, जगातील ऐंशी टक्के ऊर्जा स्रोत व खनिज संपत्ती वापरत आहेत. त्यांनी याविषयी निश्चितच विचार करणे गरजेचे आहे.
२०५ / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगा
करमणूक हा अमेरिकेतील जीवनाचा एक महत्त्वाचा भाग, त्यांच्याकडे मोठे व प्रसिद्ध चार खेळ आहेत. फुटबॉल (त्यांचा जीव की प्राण), बेसबॉल (वेळ घालविण्याचे प्रमुख साधन), बास्केट बॉल व ICE हॉकी. या सर्वांच्या वेळा चांगल्या पद्धतीने आयोजित केलेल्या असल्यामुळे, वर्षभर त्यांची खेळाद्वारे करमणूक चालू राहते. मी हे सर्व खेळ पहात होतो. मी त्यांचा आनंद मनमोकळेपणाने लुटला. या सर्व खेळांचे वैशिष्ट्य असे की हे सर्व खेळ, बहुतांश वेळेला तीन तासात संपतात. त्यामुळे त्यांच्या ऑफिस कामावर त्याचा परिणाम होत नाही.
अमेरिकेमध्ये खेळाशिवाय "सिटकॉमस" हे त्यांच्या दैनंदिनीचा मोठा भाग आहेत. माझ्या वास्तव्यात, मी बऱ्याच सिटकॉमस पाहिल्या. त्यातील साईन फेल्ड व होम इम्प्रुव्हमेंय, या माझ्या सर्वात आवडत्या. माझ्यासारख्या संगीतप्रेमींसाठी, संगीताचा आनंद लुटायला, अमेरिकेत भरपूर वाव आहे. जॅझ संगीत मला विशेष प्रिय होते. या संगीतनिर्मितीचा अमेरिकन लोकांना खूप अभिमान वाटतो.
निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या पैशाचे प्रयोजन कसे करायचे हा प्रश्न अमेरिकेला पण समाधानकारकरित्या सोडवता आलेला नाही, त्यांची लोकशाही व्यवस्था २४० वर्षे जुनी असूनही ! निवडणूक प्रचारासाठी प्रचंड पैसा लागतो. हा पैसा अतिश्रीमंत उद्योजकांकडूनच उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे लोकशाहीवर मूठभर अतिश्रीमंत उद्योजकांचेच नियंत्रण राहणार. तुम्हास आवडो अथवा न आवडो. म्हणूनच अमेरिकन्स म्हणतात की लोकशाही ही परिपूर्ण व्यवस्था नाही. पण उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी सर्वश्रेष्ठ मात्र आहे !
श्रेष्ठ असो अथवा नसो, पण अमेरिका त्यांच्याकडे लोकशाहीखेरीज इतर कुठली पद्धती येऊ देणार नाही. पण स्वतःच्या फायद्यासाठी, इतर देशांमध्ये हुकूमशाहीची स्थापना करण्यास त्यांनी कधी पुढे-मागे बघितलं नाही. ते स्वतःच्या नागरिकांना सन्मानाने वागवतात. पण दुसऱ्या देशातील नागरिकांना मात्र कस्पटाप्रमाणे वागवतात. अमेरिकन लोकांना, त्यांचे सरकार, बाकीच्या देशात जाऊन काय धुमाकूळ घालतात, हे माहीतही नसते.
२०६ / कोलाज : अमेरिकेच्या अंतरंगाचा
कधी कधी तिथे स्वातंत्र्याचा अतिरेक होतो. अती खाणे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक आहे. एक डझनापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध ठेवणे या लैंगिक स्वातंत्र्याचा अमेरिकेत अतिरेक झाला आहे असे मला वाटते. प्रत्येक अमेरिकन नागरिकाला शस्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले पण मानसिक आजार असलेल्या माणसाला है स्वातंत्र्य देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलित देणे आहे आणि त्यामुळेच अमेरिकन शाळांमध्ये अंदाधुंद गोळीबाराच्या कित्येक दुर्दैवी घटना घडत आहेत. जीवनातील समप्रमाणाचा अभाव हे अमेरिकेतील बऱ्याचश्या, व्यक्तिगत व सामाजिक समस्यांचे मूळ आहे असे वाटते.
याउलट या स्वातंत्र्याची एक सकारात्मक बाजूही आहे आणि गुणवत्ताधारित पद्धतीमुळेच, तेथील लोकांची व देशाची चांगली प्रगती झाली आहे. त्यामुळे सर्व जगातून गुणवंत व बुद्धिवंत माणसे तिथे आकर्षिली गेली. अमेरिकेत या, काम करा, निर्मिती करा आणि आपला स्वतःचाही उत्कर्ष करा. हेच खरे अमेरिकेचे घोषवाक्य आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे २०व्या शतकापर्यंत, अमेरिकेत येणाऱ्यांचे प्रमाण कमी असायचे. हे लोक आल्यानंतर अमेरिकेत स्थायिक व्हायचे. काही वर्षातच, तेथील पद्धती आत्मसात करायचे. पण गेल्या काही दशकांपासून मात्र अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. आणि आता ते अमेरिकन पद्धतीचा भाग बनत नाहीत तर ते त्या भागातून आलेल्या लोकांचे समूह बनवितात. यामुळेच सध्या अमेरिकेमध्ये, इतर नागरिकांविषयी द्वेषाचे वातावरण वरचेवर वाढत चालले आहे. ५० वर्षांनी अमेरिका हा अमेरिकन लोकांपेक्षा, आफ्रिकन अमेरिकन, एशियन व मेक्सिकन यांचा जास्त असेल. मग "मूळचे" अमेरिकन कसे वागतील, ही माझ्यासाठी कुतूहलाची गोष्ट आहे.
मुलाखतकार - लतिका भानुशाली
शब्दांकन : पुरुषोत्तम आणि पद्मा कर्हाडे