१) गुंतागुंतीची वर्गवारी
२) त्रोटक लेख
२) एकांगी वाढ
३) उल्लेखनीयतेचे निकष
४) लेखाचे शीर्षक
५) विस्ताराविषयीचे धोरण
६) साच्यांमधील भाषा आणि त्यांचा गैरवापर
७) संदर्भाचा अत्याग्रह
१) मराठी विकीवरील वर्गवारी आवश्यकता नसताना गुंतागुंतीची झाली आहे.
उदाहरणार्थ डॉना आर्मस्ट्राँग या महिला क्रिकेटपटूचे पान पाहू. त्यासाठी वर्गवृक्ष असाः
आशय – वर्ग - मूलभूत वर्ग - मानव - समाज - क्रीडा - खेळ - क्रिकेट - देशानुसार महिला क्रिकेट खेळाडू -
आयर्लंडच्या महिला क्रिकेट खेळाडू
वर दिलेल्या दहा पायऱ्या उतरल्यावर आपण आपल्याला हव्या त्या पानावर पोहोचतो. त्यापानावर ही एकमेव ओळ दिसते.
डोन्ना कॅरेन आर्मस्ट्राँग (जन्म दिनांक अज्ञात:बेलफास्ट, उत्तर आयर्लंड - हयात) ही आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९१ दरम्यान २० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
२) त्रोटक लेख
म्हणजे या खेळाडूची कारकिर्द ८७ ते ९१ इतकी ५ वर्षांची होती व त्यात तिने २० सामन्यात भाग घेतला इतकीच अधिकची माहिती मिळते.
ह्याला डोंगर पोखरून उंदीर काढणे असे म्हणतात. मराठी विकीतील बहुतेक सर्व लेख असेच आहेत! मराठी विकीवरील सर्वात जुना ज्ञात सदस्य या नात्याने हे अपयश माझेच म्हटले पाहिजे!
२) विकीची वाढ एकाच (किंवा फार तर दोन/ तीन) दिशांनी झाली आहे. एक ऍक्टीव्ह सदस्य क्रिडाविषयक लिखाण करताना दिसतो तर दुसरा फक्त महाराष्ट्रातील गावे विकीवर जमा करत जात आहे. ही पाने बॉट पद्धतीची आहेत. म्हणजे अमुक एक गाव तमुक एका तालुक्यात येते. या गावात अमुक एक टक्के स्त्री / पुरुष आहेत तर विहिरींची संख्या तमुक एक आहे. सरकारने प्रसिद्ध केलेली कुठलीतरी जुनी आकडेवारी पायथॉन किंवा स्कालामध्ये स्क्रिप्ट लिहून इथे टाकली. कुणाचीही टिंगल करायची नाहीये पण हे काम उत्तम असले तरी यांत्रिक असून विकीच्या अस्सल नियमात बसणारे नाही. पण लोकांना याचा फायदा होत आहे ते महत्त्वाचे आहे. तसेही मराठी विकीने मूळ विकीशी फार पूर्वी फारकत घेतलेली आहे. त्यामुळे या फोर्कला विरोध करण्याचे मोठे कारण उरत नाही. मराठी विकीवरील सर्वात जुना ज्ञात सदस्य या नात्याने हेही अपयश माझेच म्हटले पाहिजे!
३) उल्लेखनीय कोण?
डोन्ना कॅरेन आर्मस्ट्राँग ही आयर्लंडची महिला क्रिकेटपटू जिची सुमार कारकिर्द पाच वर्षांची होती ती विकीसाठी उल्लेखनीय आणि ग्रामीण महाराष्ट्रातला एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता ज्याच्या नावावर खंडणीच्या खऱ्या / खोट्या पोलीस केसेस चालू आहेत तो अनुल्लेखाने मारायचा. मराठी माणसांना "डोन्ना आर्मस्ट्राँग" विषयी वाचायला आवडेल की त्यांच्या आजूबाजूच्या दादा/ बाबा यांविषयी? वाचकांना काय वाचायचं आहे याचा विचार न करता मला वाचकांनी काय वाचावं असं वाटतं त्यानुसार विकीवरील लेख संपादित होतात. विकी म्हणजे संध्याकाळ / मिड-डे सारख्या टॅबलॉइड पद्धतीने चालवावी असे माझे म्हणणे नाही. पण वाचकांचा अजिबात विचार न करणारे हे एक उत्तम उदाहरण होऊ शकेल असे मला वाटते.
४) नावात काय आहे?
काही अपवाद वगळता मूळ नावाने लेख लिहिला जातो. हे अपवाद कोणते ते प्रचालक ठरवतात. जनमानसात रूढ असलेल्या नावांपेक्षा ही नावे वेगळी दिसतात त्यामुळे वाचकांना पुढे वाचण्यात रस वाटत नाही. इतकेच नव्हे तर योगदान द्यावेसेही वाटत नाही. इंग्रजी विकीवर "Pandurang Shastri Athavale" असा लेख आहे तर मराठी विकीवर "पांडुरंग वैजनाथ आठवले” या नावाने लेख आहे. त्यांचा असा उल्लेख मला मराठी विकी सोडून इतर कुठेही वाचायला मिळालेला नाही. आपल्याला ज्ञान-कोष बनवायचा आहे हे विकीवरील काहींनी इतकं गंभीरपणे घेतले आहे की त्यांच्याकडून साधे संकेत पाळले जात नाहीत. आपल्याला ज्ञान-कोष बनवायचा आहे हे बरोबर पण तो लायब्ररीच्या रॅकवर पडून राहिलेला कोष बनवायचा नाही तर लोकांच्या जीवनात स्थान मिळवणारा कोष बनवायचा आहे. त्यासाठी लोकांना महत्त्व देणं आवश्यक आहे. इंग्रजीत "B. R. Ambedkar" अशा नावाचा लेख मराठीत "बाबासाहेब आंबेडकर" असा आहे पण तो "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" असाच पाहिजे. कारण डॉक्टर/ शास्त्री या नुसत्या पदव्या नसून त्या त्यांच्या नावाचा भाग असतात. मराठी विकीवर "नृसिंह राजारामपंत कुळकर्णी" यांच्या नावावर लेख आहे. ते कोण? तर पाचलेगावकर महाराज! महाराजांचा कोणता शिष्य या लेखाचा विस्तार करणार?
५) विस्तार कोणाला हवाय?
मुळात विकीच्या प्रबंधकांना विस्तार खरच हवाय का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला एकहाती सांभाळता येईल इतकाच विस्तार त्यांना अपेक्षित आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थांना त्यांचे शिक्षक काही वेळा एखादा विषय देऊन मराठीत निबंध लिहून आणायच्या धर्मसंकटात टाकतात. अशा वेळेला त्यांच्या पालकांच्या मदतीला धावून जातो तो मराठी विकिपीडिया. वहीच्या एका पानावर लिहून होईल इतपत मटेरियल वेळेला उपलब्ध करून दिले जाते त्या अर्थाने विकी यशस्वी झालेली आहे असे म्हणता येईल.
६) साचे आणि साच्यांमधील भाषाः
खाली दिलेला साचा हा "पांडुरंग वैजनाथ आठवले” या लेखावर दिसतो.
"हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी."
यातून नक्की काय अपेक्षित आहे? "पांडुरंग आठवले" हे उल्लेखनीय (साच्यात तीन वेळा वापरलेला शब्द) नाहीत असे म्हणायचे आहे का? आणि ते सिद्ध करून कोणाला दाखवायचे? प्रचालक आधी न्यायाधीशाच्या आणि मग मालकाच्या भूमिकेत जातात. त्यांना वकिली युक्तिवाद करून पटवून द्यायचे म्हणजे नानी पालखीवाला यांच्यासारखा वकीलच नेमावा लागेल.
विकी हा प्रवाही प्रकल्प आहे. त्यातील सर्व पाने प्रयोगावस्थेत आहेत. वेगवेगळे साचे लावून लिहिणाऱ्यांचा आणि वाचणाऱ्यांचा हिरमोड करून आपली संपादन संख्या वाढवत नेणे ही चुकीची गोष्ट आहे.
७) संदर्भ द्याः
विकीवर उठसूठ संदर्भ मागितले जातात. हा ज्ञानकोष आहे मासळीबाजार किंवा कचरापेटी नाही याची सतत आठवण करून दिली जाते. हे योग्यच असले तरी त्याचा अतिरेक तरी होतो किंवा आपल्याला पटत नसलेली मते दाबण्यासाठी गैरवापर होतो. प्रत्येक गोष्टीची / वाक्याची डी. एन. ए. चाचणी शक्य नसते. शक्य असली तरी लोकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विकीसारख्या प्रोजेक्टला कोणी इतका वेळ आणि पैसा देणार नसतो.
मराठी विकीचे सिंहावलोकन
इतरांच्या नजरेतील भारतीय
त्यामुळे पुढल्या रविवारी त्याच्याकडून चहाचं आमंत्रण आल्यावर ते नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. मी ठरल्यानुसार संध्याकाळी साडेपाच वाजता त्याच्या घरी पोहोचलो.
"दिलेल्या वेळेच्या एक मिनिट आधीच आलेला तू पहिला भारतीय आहेस." चुंग प्रसन्न हसत म्हणाला.
"एक रस्ता क्रॉस करण्यात कशाला उशीर होईल?" मीही हसलो.
"पण होतो. शेजारच्या डेस्कवरून माझ्या डेस्कवर पोचायलाही उशीर होतो." आता भारतीयांच्या तक्रारींचा पाढा सुरू होणार! आपल्यातल्या उणिवा आपल्याला माहीत असतात; पण त्यांची उजळणी झालेली काही वाईट नाही. मसाला चहाचे वाफाळते कप, तैवानमधून आणलेली चीज भरलेली बिस्किटं आणि कोलंबीच्या फ्लेवरच्या रताळ्याच्या चिप्ससारखं उत्तम खाणं समोर आल्यावर तर अजिबातच नाही.
"भारतीयांचं कुठलं कुठलं वागणं तुझ्या डोक्यात जातं?" मी पिन मारली.
"वेळ आणि नियम न पाळणं.. कधी स्वार्थासाठी, तर कधी काहीही कारण नसताना उगाच खोटं बोलणं.. रस्त्यावरच्या पशुपक्ष्यांना खायला घालणं आणि त्यांना माणसासारखं ऐदी आणि आळशी करून ठेवणं.."
भूतदयावादी असलो तरी चुंगच्या बोलण्यातल्या मिश्किल टिप्पणीने मला हसू आलं. त्याची यादी अजून संपलेली नव्हती.
"..स्वत: डोळे फाडून बघत राहतील आणि आपण स्माइल दिलं तर नजर चुकवून दुसरीचकडे बघतील. पण ते एक वेळ परवडलं, काही काही जण तर जुजबी ओळखीवर कुठलेही पर्सनल प्रश्न विचारायला लागतात.. बाकी त्यांची कल्पनाशक्ती मात्र सॉलिड असते हा. आणि बऱ्याचदा ते आपल्याच विश्वात मग्न असतात.."
मी क्षणभर चपापलो. कारण मीसुद्धा फक्त हसण्यात आणि खाण्यातच मग्न होतो.