रानभाज्या ओळखा

http://www.lokprabha.com/20120803/shrawan_vishesh.htm

कुलुची भाजी : पावसाळा सुरू झाल्यानंतर अगदी प्रथम बाजारात येणारी भाजी कुठली असेल तर ती कुलुची भाजी. याला कारण म्हणजे ह्य़ा झाडाचा अगदी वैशिष्टय़पूर्ण असा जीवनक्रम! पावसाचा थोडा जरी शिडकावा होऊन जमीन ओली झाली तरी लगेचच दुसऱ्या दिवशी जमिनीत असलेल्या कंदामधून पाने बाहेर पडतात. कांद्याच्या पातीप्रमाणे गर्द हिरव्या रंगाची ही पाने दोन दिवसांतच चार ते पाच होतात. तिसऱ्या दिवशी ह्य़ा झाडांच्या पानांमधून चक्क फुलांचा दांडा कळ्या घेऊन बाहेर पडतो व पांढऱ्या रंगाची फुले उमलतात. चौथ्या-पाचव्या दिवशी तर ह्य़ा कळ्यांच्या जागी फळेही लागलेली दिसतात. साधारण एक आठवडय़ाच्या आतच ह्य़ा झाडाचा जीवनक्रम पूर्ण होतो. म्हणूनच पाऊस सुरू झाला की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच ही भाजी बाजारात येते.
कांद्याच्या वर्गातील व लिलिअ‍ॅसी या कुळातील या झाडाचे शास्त्रीय नाव Chlorophytum tuberosum असे आहे. शक्तीवर्धक असलेल्या मुसळीच्या प्रकारातीलच हे झाड आहे. वर्षांतून फक्त एक आठवडाच उपलब्ध असलेल्या ही भाजी इतर पालेभाज्यांसारखीच नुसती कांद्यावर परतून केली तर फारच चविष्ट लागते.
आंबट वेल :- नावाप्रमाणेच ही भाजी आंबट असतेच, शिवाय वेल स्वरूपात असते. दुसऱ्या झाडांच्या किंवा आधाराने वाढणाऱ्या वेलीचे हे अगदी कोवळे कोंब असतात. त्यांना ताण (Tendrils) सुध्दा असतात द्राक्षांच्या वर्गातील व ‘व्हायटॅसी’ कुळातील या झाडाचे शास्त्रीय नाव आहे Cayratia trifolia अथवा Vitis carnosa. या वेलीला तीन दलीय पाने असल्यानेच याला ‘ट्राय फोलीया’ म्हटले जाते. पाऊस सुरू होताच या वेलीला नवीन कोंब फुटतात. जुन होण्यापूर्वीच हे कोंब भाजी म्हणून वापरले जातात. कडधान्यांच्या आमटीमध्ये ही भाजी चिरून टाकण्याची पद्धत आहे, पण वालाच्या बीरडय़ामध्ये ह्य़ा भाजीची चव काही औरच असते!
कोरेलाची भाजी (कोरेळ) :- ह्य़ा सर्व भाज्यांमध्ये आपटय़ाच्या पानांप्रमाणे दिसणारी कोवळ्या पोपटी रंगाची भाजी म्हणजे कोरेलाची भाजी. आपटय़ासारखी दिसणारी पाने म्हटल्यानंतर कांचन वृक्षाच्या वर्गातील व ‘सिझाल्पीनिअ‍ॅसी’ या कुळातील ह्य़ा झाडाचे शास्त्रीय नाव आहे Bauhinia malbarica. बऱ्याचदा आदिवासी जवळपासच्या ह्य़ा झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटून ठेावतात. पावसाळा सुरू होताच ह्य़ा झाडास नवीन कोंब, फांद्या येऊन पालवी फुटते. हीच नवीन पालवी भाजी म्हणून बाजारात आणली जाते. रक्तशुद्धीसाठी उपयुक्त अशा ह्य़ा भाजीचे गुणधर्म आहेत.
भारंगीची भाजी (भारंग) :- ही भाजीसुद्धा झाडाचे नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानांच्या स्वरूपात काढली जाते. ‘व्हर्बिनॅसी’ कुळातील ह्य़ा भाजीचे शास्त्रीय नाव आहे Cleredendron serratum. करवतीसारख्या दातेरी पानांच्या कडा असल्याने याला सिरॅटम् असे म्हटले जाते. यांच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. भाजी करण्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे वालांचे दाणे भिजवून, भाजून ती भाजीत घालून केलेली सुकी भाजी. साधारणत: गणपतीच्या सुमारास ह्य़ा झाडास निळसर जांभळ्या रंगाचे फुलांचे तुरे येतात.
शेवळा :- आत्तांपर्यंत वर आपण काही पालेभाज्या पाहिल्या. ही भाजी इतरांपेक्षा वेगळी आहे. शेवळा म्हणजे खरं तर सुरणाच्या फुलांची दांडी. जमिनीत असलेल्या सुरणाच्या कांद्याला पावसाळा सुरू झाला की उंच दांडी असलेला फुलोरा बाहेर येतो. हा फुलोरा खरं तरं आतून गुलाबी व बाहेरून तपकीरी जांभळट रंगाच्या बोटीच्या आकाराच्या टोपणात झाकलेले असतात. फुलोरा अतिशय नाजूक सोनेरी पिवळसर रंगाचा व तळाकडे जांभळट होत गेलेला असतो. ह्य़ा फुलोऱ्याच्या तळाशी मादीफुले तर वरच्या बाजूस नरफुले असतात. भाजीसाठी संपूर्ण फुलोऱ्याची दांडीच वापरतात. ह्य़ामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण खूप असते, पण ताज्या दांडय़ाची भाजी लवकरात लवकर करणे आवश्यक असते. कारण फुलोऱ्याला झाकणारे टोपण व ह्य़ामध्ये असलेल्या जास्त प्रोटीन्समुळे हे शिळे झाले तर कुजलेल्या मांसासारखा घाणेरडा वास याला येऊ लागतो.
अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असलेली ही भाजी म्हणजे सुरणाचे फुल असल्याने त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे सुईसारखे क्रिस्टल्स असल्याने खाजते. हे टाळण्यासाठी अर्थातच शेवळे वाफवून घ्यायची, चिंच अथवा इतर आंबट पदार्थ घालून भाजी शिजवण्याची काळजी घ्यावी लागते. काही ठिकाणी तर आदिवासी या भाजीसोबतच ‘नानाचा पाला’ जो आंबट असतो तोही विकत देतात. एकदा ही भाजी खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. ती चव घेतल्याशिवाय कळणार नाही.
सुरण वर्गातील व अ‍ॅरॅसी कुळातील ह्य़ा झाडाचे शास्त्रीय नाव आहे Amorphophallus commutatus.
ह्य़ाच प्रकारातील रानसुरणाच्या फुलास व भाजीस स्थानिक भाषेत लोथ असे म्हटले जाते.
कंटोली :- पावसाळयातील पालेभाज्या आणि फुलभाज्यांनंतर ही एक फळभाजी आहे. पावसाळा सुरू झाला की जुन्या वेलीच्या मुळाच्या गाठीपासून अथवा बिया रूजून ह्य़ा वेलींना फुटवा फुटतो. त्याची झपाटय़ाने वाढ होऊन पाच ते सहा पानांवर असतानाच जंगलांत सर्वत्र हया जमिनीलगत वाढलेल्या वेलींवर पिवळी फुले दिसू लागतात. बारा-पंधरा दिवसातर कंटोली धरतात. आदिवासी ती शोधून बाजारात आणतात. कंटोली फळांची भाजी खूपच लोकप्रिय आहे. फळे साधारणत: पाच ते सात से.मी. लांबीची असतात. आकाराने लांबट-गोल असतात व त्यावर मऊ काटे असतात. फळात बीया भरपूर असतात. कोवळ्या फळांची भाजीच चांगली होते.
कारल्याच्या वर्गातील व सर्वात जास्त फळभाज्या ज्या कुळातील आहेत, त्या ककुरबीटॅसी कुळातील ह्य़ा झाडाचे शास्त्रीय नाव आहे, Momordica dioica. भाजी रूचकर असते पण चिकट असते. विविध प्रकारांनी ही भाजी केली जाते, पण वालाच्या आमटीत टाकून केलेली भाजी अथवा भरलेली कंटोली छान लागतात. कारल्याच्या वर्गातील असल्याने औषधात त्याचे कडू गुणधर्म असून ते जठरोतेजक व सारक आहेत.
कुडय़ाच्या शेंगा :- सह्य़ाद्रीच्या जंगलात सर्वत्र आढळणारे हे झाड. कुडय़ाला पावसाळ्यापूर्वी फुले येतात व पावसाळ्यात एका डेख्यास जोडलेल्या दोन शेंगा येतात. या कोवळया शेंगा भाजीसाठी वापरतात. त्या चिकट असल्याने शेंगा आधी वाफवून घ्याव्या लागतात. करवंद अथवा सदाफुलीच्या वर्गातील व अ‍ॅपोसायनॅसी या कुळातील या झाडाचे शास्त्रीय नाव आहे Holarrhena antidysentierica. डिसेंट्री (जुलाब) वर असलेले एक औषध म्हणूनच नाव ‘अ‍ॅन्टीडिसेट्रीकाय’ अर्थातच ही भाजीसुद्धा पाचक, औषधी गुणधर्म असलेली असते.
या काही प्रमुख भाज्यांबरोबरच इतर काही भाज्या पावसाळ्यात येत असतात.
टाकळयाची भाजी :- पाऊस पडू लागताच जमिनीत पडलेले टाकळ्याचे बी रूजून नवीन कोवळी झाडे उगवतात. मेथीच्या भाजीप्रमाणे कोवळी रोपे भाजीसाठी आणली जातात. ‘सिझाल्पीनॅसी’. या कुळातील या झाडाचे नाव आहे Cassia tora.
दिंडा :- आधीचा पावसाळा संपल्यानंतर पूर्णपणे सुप्तावस्थेत गेलेल्या ह्य़ा झाडाला पावसाळ्यात नवीन कोंब येतात. पाने पूर्ण फुटण्यापूर्वीच हे कोंब काढून भाजीसाठी वापरतात. ‘लीअ‍ॅसी’ या कुळातील या झाडाचे शास्त्रीय नाव आहे Leea macrophylla.
कुरडू :- ‘अमरॅन्टॅसी’ या कुळातील Leea macrophylla हे शास्त्रीय नाव असलेले झाड म्हणजेच कुरडू. शेतात आणि ओसाड रानावर वाढणारे हे तण आहे. पावसाळयाच्या सुरुवातीस वाढणाऱ्या कोवळ्या झाडांचा वापर पालेभाजी म्हणून केला जातो. दसऱ्याच्या सुमारास यास पांढरे, गुलाबी रंगाचे कणसासारखे फुलोरे येतात. झोप येण्याचे औषध म्हणूनही यांच्या पाल्याच्या भाजीचा वापर करतात.
नेहमीच्या अळूप्रमाणेच रानात वाढणारा हिरव्या देठाचा अळू विशेषत: पानांचे देठ भाजीसाठी आणले जातात. ह्य़ा भाजीस ‘तेरा’ असे ओळखले जाते.
चिंचेसारख्या पानांची ‘कवळा’ ही पालेभाजी सुद्धा आणली जाते. या व्यतिरिक्त पावसाळ्यात वाढणाऱ्या ‘अळंब्यां’ची, विविध झाडांच्या फुलांचीही भाजी केली जाते. हे सारं रानात अथवा जंगलात वाढणारं म्हणूनच ह्य़ा रानभाज्या! जंगलातील आदिवासींना याची चांगली ओळख असते. लोकवनस्पती विज्ञानाचा अभ्यास असे दाखवतो की पावसाळ्याच्या सुरुवातीस असलेला अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी, पौष्टीक अन्न मिळावे म्हणून निर्सगाने मुद्दामहून निर्माण केलेल्या भाज्यांचा वापर आदिवासी करीत असतात. आदिवासी एक उपजीविकेचे साधन म्हणून जंगलातून ह्य़ा भाज्या गोळा करून बाजारात आणतात म्हणून आज शहरातूनही या भाज्या उपलब्ध होतात. इतर भाज्यांप्रमाणे लागवड शक्य नसल्याने पावसाळ्याच्या मोसमातच या भाज्या उपलब्ध होतात. पण आजकालच्या शहरी गृहिणींना या भाज्यांची माहिती नसल्याने त्या हया भाज्यांकडे फिरकतही नाहीत, पण जुन्या गृहिणी मात्र आवर्जून ह्य़ा वर्षांतून एकदाच येणाऱ्या भाज्यांची वाट पाहत असतात. रूचकर, षौष्टिक व औषधी गुणधर्म असणाऱ्या ह्य़ा भाज्यांची चव वर्षांतून एकदाच मिळते. तिचा आस्वाद घ्यायलाच हवा.