आत्मपुराण

- महादेवशास्त्री जोशी

Page 26/ 31/ 62/ 70

पुरुषांच अन् मुलांचं काम उरकलं की न्हावी मग प्रत्येक घरच्या गोठ्यात जायचा. दीड-दोन महिने ताटकळल्याने ' तशा ' बायकांची दशा दयनीय व्हायची. पदर दाबून बसावायचा तरी किती ! अशा सगळचा बायका आत्मारामाच्या नावाने बोटं मोडीत त्याला' काळमुखा ' म्हणत. घरोघरी एक-दोन अशी गिऱ्हाइकं त्याला उरकावी लागायची.

कसं ते कोण जाणे ! समजायला लागल्यापासून या क्रूर रूढीची मला चीड होती. त्याला कारणही तसंच घडलं होतं. आमच्याच घरात राहणाऱ्या माझ्या आतेची सून! विचारी पंधराव्या वर्षी बालविधवा झाली. आमचा तो आतेभाऊ सांगलीला अध्ययनासाठी गेला होता, तो तिकडेच प्लेगने वारला. आमचं सगळं घर हुंदक्यांनी घुमलं अन् अश्रूनी भिजलं. या घटनेचं गांभीर्य समजण्याचं माझं वय नव्हतं. माझी ती वहिनी मला खूप आवडायची. गाडग्यात शिजवलेलं 'आटवल' ती मला रोज भरवायची. पण तिला गोठ्यात पाठवण्याचा 'समारंभ' ज्या दिवशी झाला अन् ती जेव्हा माथ्यावर पदर घेऊन रडत, आक्रंदत घरात आली, तेव्हा तिचं ते विद्रूप पाहून मी ढसढसा रडलो होतो. त्यानंतर मी कधीच तिच्याजवळ गेलो नाही.

आमच्या मुलांचं शिक्षण म्हणजे मुख्यत्वे अक्षरओळख. पुढे संध्या, वैश्वदेव, जानव्याचा मंत्र आणि डोक्यावरून पाणी म्हणजे रुद्र-पवमान !

आमच्या गावातल्या पुरुषांची पाच बोटं एखाद्या पुस्तकाला लागली आहेत, असं जन्मात कधी घडलं नाही. यामुळे कुळवाड्यांचा अन् आमचा सांस्कृतिक स्तर सामान्यपणे सारखाच. कुळवाड्यांसारखीच आमची विचारसरणी. आम्हीही देवदेवस्की, धाडीभगत हे सारं करीत होतो. त्यातला फोलपणा समजण्याइतकी आमची बुद्धी कधी विकसित झालीच नाही. कुळवाडी अन् भट यांच्यांतला एकच फरक म्हणजे भटाच्या खांद्यावरचं जानवं. आमच्या घरचा एकमेव 'ज्ञानग्रंथ' म्हणजे भितीवर टांगलेलं पंचांग. ते मात्र आम्ही सगळे वाचू शकत होतो. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग अन् करण हे आम्हाला माहीत होतं. 'अभकृ' किंवा 'विप्री आ' ही कशाची आद्याक्षरं आहेत, ते आम्ही जाणत होतो.

_____

आमच्या गावात विरेभट नावाची एक ' कीड' होती. बायको मेल्यावर त्याने एक 'विठ्ठल सवाशीण' घरात आणली होती. कुठनं आणली होती देव जाणे ! पण ती जन्मभर त्याला घरून राहिली होती, हे विशेष. हा विरेभट दिवसभर एका पंचाची 'काष्टी' लावून असायचा. त्याची पडवी म्हणजे गावाची चावडीच जणू ! विरेभट गावात कलागती लावण्यात नारदाचा बाप होता. त्याने वाळपईच्या काही अधिकाऱ्यांना 'मुखलेप' करून आपल्या कलागतींच्या मागे सामर्थ्य उभं केलं होतं. गावातले सगळे लोक त्याला वचकून असायचे. तो प्रथम एखाद्याचा बुद्धिभेद करी, त्याला तालुक्याला जायला लावी आणि 'दक्षिणा' घेऊन मग त्याच्या पाठीशी उभा राही. बरेचसे दावे विन-बुडाचे असल्यामुळे पुष्कळदा त्याला अपयशही येई. मग तो दुसरं शस्त्र बाहेर काढी. बहिष्कार ! ज्याने दावा जिंकला असेल त्याच्यावर सगळ्या गावाचा बहिष्कार ! विरेभटानं सांगितलं म्हणजे सगळ्यांना ऐकावंच लागे. बहिष्कृत व्यक्तीकडे कोणी जेवाखायला जायचं नाही. त्याला आपल्या घरी बोलवायचं नाही. त्याच्याशी बोलणंही टाकायचं. बहिष्कार म्हणजे त्या गावढ्या गावातलं एक 'ब्रह्मास्त्र' होतं. त्यामुळे बहिष्कृताचा जीव मेटाकुटीला यायचा. तो माणसांतूनच उठायचा.

आमच्या आजीवरही या विरेभटाने एकदा हा प्रसंग आणला होता. काही फणसाच्या झाडांवरून आजीचं भाव्यांशी भांडण होतं. विरेभटाने भाव्यांचा पक्ष घेतला होता. पण दिवाणीत आजीचा दावा खरा ठरला होता. विरेभटाच्या माथी अपयश आलं होतं. आणि ते धुवून काढण्यासाठी गावकी भरवून त्याने आमच्या घरावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कारामुळे कानकोंडा कोण झाला असेल, तर तो मी. बरोबरीची मुलं माझ्या अंगणात येईनात. मला खेळायला घेईनात. शेजारी कुठे सत्यनारायण व्हायचा, कुठे लग्नकार्य व्हायचं, कुठे बारसं, कुंठे काही होत असायचं. सगळं गाव तिथे गोळा व्हायचं. मुलं गोंधळ घालायची. मी मात्र घरच्या घरी. मी त्या घराकडे नुसता बघत राहायचा. डोळे गाळायचा, घरात घड जवायचा नाही. माझी अशी सामा-जिक उपासमार झाली होती. आणि वर मुलं मला चिडवीत होती. त्या चिडवण्याला मी उत्तर देऊ शकत नव्हतो. माझ्या सगळया कळाच उतरल्या होत्या. आजीला हे जाणवलं. आपल्या एकुलत्या नातवाची ही 'अवस्था' तिला पाहवली नाही. तिने मग काय केलं असेल ते तिचं तिलाच ठाऊक ! कदाचित तिने विरेभटाचं 'हिरण्यश्राद्ध' केलं असेल. मग विरेभटाच्या सांगण्यावरून आजीने आमच्या घरी सत्य-नारायण केला. आणि मग त्याच्या तीर्थप्रसादाला सगळे ग्रामस्थ आमची पडवी चढले. मी पुन्हा माणसांत आलो.

_____

असं हे आमचं गाव ! आमचंच कशाला ! सगळीच गावं याच स्थितीची अन् एकाच प्रवृत्तीची. त्या काळी आधुनिक शिक्षणाकडे कोणी लक्षच दिलं नाही. आपला एखादा तरी मुलगा पोर्तुगीज शिक्षणाकडे घालावा, त्याला नवा मार्ग दाखवावा, असं कधी कोणाला भावलंच नाही. ते भावलं असतं, तर काही मुलं तरी पोर्तुगीज शिकली असती अन् त्यामुळे सरकारदरबारी होणारी भटांची मानखंडना टळली असती. महत्त्वाकांक्षा नावाची एक स्पृहणीय वस्तू असते अन् ती सारं जीवनच बदलून टाकते, हे कोणी त्यांना शिकवलंच नाही. सगळेच पूजा, पुरुषसूक्त अन् जानव्याचा मंत्र घोकीत राहिले. त्यांना आपल्या मागासलेपणाची, परावलंबित्वाची कधी खंत वाटलीच नाही.

मात्र एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. त्यांनी आपल्या गरीब संसाराचं कधी कोणापुढे प्रदर्शन केलं नाही. ते 'आल्या अतिथा मुठभर द्याया' कधीच चुकले नाहीत. त्यांच्या कपाळावर कधी आठी दिसायची नाही. चार लोक एकत्र जमले की हसून-खेळून वेळ घालवीत. सिने-नटाच्या ऐटीत ते विड्या फुंकीत अन् चंची सोडून नवाबी रुबाबात पान-तंबाखू खात. त्यांच्या अंतरात एक गोष्ट पक्की भिनलेली असे-

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असो द्यावे समाधान ।।

_____


अध्ययनाचा श्रगिणेशा

मला पाचवं वर्ष केव्हा लागेल, याची आजी जणू वाटच पाहत होती. ते पौषात लागलं आणि माघात तिने उपाध्यांना बोलावणं धाडलं. त्यांनी मुहूर्त पाहून माझ्याकडून गणपतिपूजन करून घेतलं. आतेने मातीचं वस्त्रगाळ चूर्ण करून धूळपाटी तयार केली. उपाध्यांनी मला चिमुट करायला लावून माझ्याकडून धुळपाटीवर 'श्रीगणेशायनमः ओनामासिधम्' ही अक्षरं काढून घेतली.

त्यानंतर मग आतेने माझा ताबा घेतला. तिने एका वर्षांत मला अक्षरओळख करवली. मग पहिली-दुसरीची पुस्तकं आणून ती माझ्या-कडून वाचून घेतली. त्या कामी मी आतेच्या हातचा थोडा प्रसादही खाल्ला. मला आठवतं, की त्यावेळच्या दुसरीच्या पुस्तकात 'एका कोळियाने' ही कविता होती आणि काळया पिऱ्याची गोष्टही होती. ती गोष्ट मला फार आवडायची.

अशा रीतीने पुस्तक वाचायला यायला लागल्यावर आतेनं मला आपल्या यजमानांच्या म्हणजे गाडगीळ भटजींच्या स्वाधीन केलं. त्यांनी लगेच शिक्षेची पोथी माझ्यापुढे उलगडली. 'अथ शिक्षां प्रवक्ष्यामि-' ज्याला शास्त्री-वैदिक व्हायचं असेल, त्याची अंकलिपी म्हणजे पाणिनीय शिक्षा. शिक्षा, ज्योतिष, छंद, निघंटू आणि अष्टाध्यायी ही वेदाची पांच अंगं. ती पाचही मुंज होण्याच्या पूर्वी पाठ झालीच पाहिजेत, असा दंडक असायचा. अर्थात् ज्याला वेदशास्त्रसंपन्न व्हायचं असेल, त्यालाच हा दंडक लागू.

शिक्षा ही पाणिनीच्या नावावर असली, तरी तिचा कर्ता दुसराच कोणीतरी आहे. संस्कृत आणि प्राकृत श्लोक अन् वेद यांच्या योग्य उच्चारणासाठी शिक्षेची नितान्त गरज असते. शिक्षेमध्ये त्या उच्चारणाचे नियम सांगितले आहेत. प्राचीन काळापासूनच वैदिक लोक मंत्राच्या योग्य उच्चारासाठी कमालीची दक्षता बाळगीत. ती परंपरा आजतागा-यतही खंडित झालेली नाही. अस्सल वैदिकाने म्हटलेला मंत्र आणि परंपरागत अध्ययन न झालेल्या पुरुषाने उच्चारलेला मंत्र यातली तफा-वत कोणाच्याही कानाला सहज समजते. हे देणं त्या शिक्षेचं. हा ग्रंथ अवघ्या साठ श्लोकांचा आहे.

दुसरं वेदांग ज्योतिष. अवघ्या ३६ श्लोकांचा हा ग्रंथ लगधाने निर्माण केलेला आहे. वैदिक आर्यांना यज्ञयागासाठी दिशा, देश अन् काल यांच्या ज्ञानाची गरज होती. यज्ञाची कुंडं, आणि यज्ञमंडप यांच्या रचनेसाठी दिशासाधन आवश्यक असायचं. विशिष्ट नक्षत्रांवर विशिष्ट विधी करायचे असत. त्यासाठी नक्षत्र अन् ग्रह यांच्या गतिस्थितीचं ज्ञान होणं जरूर असायचं. ही गरज लगधाच्या ज्योतिष ग्रंथाने पुरी केली आहे. पिंगलनाग या छंदःशास्त्रज्ञाने छंद नामक वेदांग निर्माण केलं. मंत्र म्हणायचा तर छंदज्ञान अत्यावश्यक होय. ऋग्वेद हा सात मुख्य छंदात निबद्ध असून हे अक्षरपरिमाणाचे छंद आहेत. इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा वसंततिलका इत्याडी छंद हे लौकिक होत. ते गणबद्ध आहेत. त्यांचीही लक्षणं सांगून लगधाने पुढे संस्कृत काव्याचं अध्ययन करणाऱ्यांची सोय करून ठेवली आहे.

निघंटू म्हणजे वेदांतल्या कठीण शब्दांचा कोश. प्रजापतिकाश्यप हा या कोशाचा कर्ता आहे. 'गौः ग्मा, क्ष्मा, क्षमा इथून याची सुरुवात होते. याचे पांच अध्याय आहेत. पहिल्या तीन अध्यायांत सगळे एकार्थ-वाची शब्द आहेत. चौथ्या अध्यायांत अनेकार्थवाचक शब्द येतात. पांचवा अध्याय हा दैवतकांडाचा आहे. याच निघंटूवर आधारून यास्काने आपलं निरुक्त लिहिलं आहे.

अष्टाध्यायी हे पांचवं वेदांग. हा व्याकरणाचा ग्रंथ आहे. नांवावरूनच त्याचे आठ अध्याय आहेत, हे कळून येईल. हा ग्रंथ पाणीनिक्कृत असून तो सूत्रबद्ध आहे. यांतली काही सूत्रं अगदी छोटी, तर काही मालगाडीसारखी लांबलचक आहेत. काहीतर सगळी जोडाक्षरांचीच आहेत. ती पाठ करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. पण प्रयत्नाने ती मुखो-द्गत केली, तर जीभ तलवारीच्या पात्यासारखी 'धारदार' होते. 'अशी लवे, तशी लवे !'

एवढं सगळं पाठांतर करून मी आठव्या वर्षी मुंजीला उभा राहिलो. आजी खूष होती. माझं योग्य तेवढं अध्ययन झाल्याचा तिला आनंद झाला होता. ही सारी गाडगीळभटजींची कृपा होती. म्हणून मग आजीने माझ्या मुंजीचा थाट उडवून दिला. साऱ्या सत्तरीला सहकुटुंब सहपरिवार निमंत्रण धाडलं. शकुनउंडे हे पक्वान्न. वर तुपाची धार. आजीने त्या बाबतीत 'वित्तशाठ्य' केलं नाही. मुंज म्हणजे उपनयन. आणि उपनयन म्हणजे पुढील अध्ययनासाठी बटूला गुरुगृही पाठवणं. अवघ्या आठ वर्षाच्या नातवाला पदराखालून दूर करणं.

आजीने तीही तयारी आधीच करून ठेवली होती. धावे हे आमच्या गावाला लागूनच असलेलं गांव. तिथे माझी मावशी राहत होती. तिचे यजमान दामोदरशास्त्री जोशी हे व्युत्पन्न होते. आजीने मला तिथे ठेवायचा निर्णय घेतला. रामनवमी हा प्रस्थानाचा मुहूर्त निश्चित केला. हे सगळं खरोखर माझ्या जिवावर आलं होतं. विद्येसाठी कष्ट सोसणं भाग आहे, ही जाणीव निर्माण होण्याइतकं ते माझं वयही नव्हतं. पण मी अगतिक होतो.

पण एक गोष्ट मात्र निश्चित होती. सकाळच्या वेळची संथा माझी कधी चुकली नाही. दत्तूमामा त्या बाबतीत मात्र तत्पर होता. उणीपुरी अडीच वर्षं मी मावशीकडे राहिलो. तेवढ्या अवधीत मी शब्द-रूपावली, समासचक्र आणि अमरकोश एवढं सुखेनैव पाठ केलं. माझी पाठशक्ती चांगली होती. मी 'एकपाठी' नसलो तरी 'त्रिपाठी' खासच होतो. कोणताही श्लोक तीन वेळा म्हटला किंवा लक्ष देऊन ऐकला, की तो मला पाठ होत असे. अमरकोश हे भारतीय संस्कृत साहित्यातलं एक आठवं आश्चर्य आहे. तो शब्दकोश खरा; पण श्लोकबद्ध. त्याची तीन कांडं असून तिन्ही मिळून त्यांत दहा हजार शब्द आहेत. एकाच शब्दाला कितीतरी प्रतिशब्द. उदाहरणार्थ 'देव' हा शब्द घ्या. त्याचे अमर, निर्जर, त्रिदश, विबुध, सुर, त्रिदिवेश, दिवौकस असे कितीतरी पर्याय शब्द त्यात आहेत. शब्दाचे प्रतिशब्द तर कळावेच; पण त्याबरोबरच त्याचं लिंगही समजावं, अशी त्याची आश्चर्यकारक रचना आहे. त्याचं खरं नांव आहे, 'नालिगानुशासनम्' पण कोण्या अमरसिहाने तो रचला असल्यामुळे 'अमरकोश' याच नांवाने तो प्रसिद्ध झाला. आजही संस्कृताच्या अभ्यासकांच्या तोंडी तेच त्याचं नाव आहे. असं पुष्कळ ग्रंथांच्या बाबतीत घडलं आहे. ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरांनी दिलेलं नांव आहे 'भावार्थ दीपिका.' पण त्या नांवाने वारकरीसुद्धा त्याला ओळखणार नाहीत. ज्ञानेश्वरकृत म्हणून ज्ञानेश्वरी हेच त्याचं नाव सर्वांच्या तोंडी बसलेलं आहे. अमरकोशाचीही तीच कथा ! अमरकोशावर अनेक पंडितांनी टीका लिहिल्या आहेत. यावरून संस्कृत भाषेच्या अभ्यासकाला प्राचीनकाळापासूनच अमरकोशाचं किती महत्त्व होतं ते कळून येतं. अमरकोशामुळे संस्कृतभाषेच्या महासागरांत सुखाने प्रवेश करता येतो. त्याच परिपाटीला अनुसरून मीही अमरकोश पाठ केला यात नवल नाही. त्या बाळपणी पाठ केलेल्या ग्रंथाचा मला अजूनही उपयोग होतो. कोणी एखाद्या संस्कृत शब्दाचा अर्थ विचारला, तर मी अमरकोशातली ती पंक्तीच म्हणून जातो.

अमरकोश मुखोद्गत झाल्यावर गुरुजींनी माझ्या हातात रघुवंशाचं पुस्तक दिलं. गुरुजींची शिकवण्याची पद्धत फार चांगली होती. ते शिकवीत नसत; तर विद्यार्थ्याला स्वतःच शिकायला लावीत. रघुवंश हे संस्कृत रसिकांच आवडतं महाकाव्य. कालिदासाला पंडित मंडळी कालि-दास म्हणून उल्लेखण्याऐवजी 'रघुकार' याच पदवीने उल्लेखितात. गुरुजींनी त्यांतले दुसरा अन् पांचवा हे दोन सर्ग मला पाठ करायला लावले अन् तेवढ्यांचाच अभ्यास घेतला. ते दोन्ही सर्ग पदच्छेद, समास, विग्रह, अन्वय, प्रतिशब्द अशा प्रकारे घोटून घोटून घेतले. त्यावरची मल्लिनाथीही वाचायला लावली. मला मल्लिनाथी कळत नसे. पण गुरुजी म्हणत, 'वाचीत जा, आपोआप कळायला लागेल.' आणि झालंही तसंच. थोड्या काळानंतर मला संस्कृतात रस वाटू लागला. हा लाभ सर्वांत मोठा होता.