साथ सोबत

आक्काचं बालपण खेडेगावात गेलं. घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि दर वर्षाला येणारी आईची बाळंतपणं यांमुळे आक्काचा आणि शिक्षणाचा कधी संबंधच आला नाही. तिचा आवाज भसाडा आणि किंचित घोगरा. आक्काच्या नाकाडोळ्यांबद्दल न बोललेलं बरं. उंचीनं बेताची आणि आडव्या अंगाची. अशा मुलीचे शंभर / दिडशे वर्षांपूर्वी लग्न जमणे जवळपास अशक्यच होते. त्यामुळे तिच्या बापाने ती तेरा - चौदा वर्षांची असतानाच पैसे घेऊन एका ७५ वर्षे वयाच्या म्हातार्‍याबरोबर तिचे लग्न लावून दिले. अपेक्षेप्रमाणे दोन - चार वर्षात म्हातारा मेला. ती सतराव्या वर्षीच विधवा झाली. मग तिचे हात पाय बांधून तोंडात बोळा कोंबून तिला बोडकी केली.  सुंदर केस गेल्यावर ती आपोआप सोवळी झाली. पण पुढे तिने आपल्या शारीरिक गरजा कशातरी पूर्ण करून घेतल्या असे या कथेत जाता जाता सुचविलेले आहे. मला एक गोष्ट कळत नाही की या सगळ्यात तिची नेमकी काय चूक झाली? त्या काळातील पुरुष मानसिकता तपासून पहायला नको का? 

अक्काच्या वडिलांना मरून शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली असली तरी काही प्रश्न त्या काळातील पुरुषांना विचारावेसे वाटतातः

१) "घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि दर वर्षाला येणारी आईची बाळंतपणं ":
घरात जे आहेत त्यांनाच खायला अन्न नसताना दर वर्षा - दोन वर्षांनी खाणारे एक तोंड वाढविण्याचा विचार देखील कसा सुचू शकतो? 

२) नाइलाजाने मुलगी विकली असे समर्थन करताना थोडी तरी लाज वाटली का? की त्या वेळी आपल्या दारिद्र्याचा अभिमानच वाटला?

३) पैशांसाठी पंचाहत्तर वर्षांच्या म्हातार्‍याबरोबर तिचे लग्न लावून दिले, ठीक आहे. त्यावेळी ती लवकरच विधवा होण्याची शक्यता आहे हे माहीत नव्हते का? अपेक्षेप्रमाणे तसे घडल्यानंतर केशवपनासंबंधी निर्णय घेण्याचे स्वातंत्र तरी तिला देवून आपण तिच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करायची संधी वाया का घालवली? रूढी / परंपरा जपण्याच्या अट्टाहासात आपण दुसर्‍या मनुष्यप्राण्यावर अमानवी अत्याचार करीत आहोत याची जाणीव शेवटपर्यंत झालीच नाही का?

_____

पुस्तकः साथ सोबत
लेखिका:  सिंधू (उषा) वसन्त कानेटकर
पहिली आवृत्ती: २००६ / १९२८

एक पेटती मशाल

विशेषनाम अर्थवाही नसतं, हा व्याकरणाचा नियम तितकासा खरा नाही. पुष्कळवेळा काही विशेषनामं बरंच काही सांगून जातात. एक दोन महिन्यांपूर्वी मी बेळगावला गेले होते. जाताना निपाणीजवळ एका दुकानावर पाटी लटकत असलेली दिसली-"पट्टणकोडीकर ब्रदर्स". ती पाटी वाचल्यावर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. या पट्टणकोडी गावात आक्काखेरीज आणखी कुणी लोकं राहत असतील ही कल्पनाच आम्हांला कधी आली नाही. सगळं गाव आक्काला "पट्टणकोडीची आक्का" या नावानं ओळखायचं. दुकान मागे गेलं, निपाणी गावही मागे पडलं, पण त्या पट्टणकोडीची आक्का मात्र माझा पाठपुरावा करीत होती. त्या एका विशेषनामानं माझ्यापुढे आठवणींचा डोंगर उभा केला. गाडी बेळगावच्या दिशेने धावत होती; पण मन मात्र कोल्हापूरच्या दिशेने धावत होतं. क्षणार्धातच साठ वर्षांचं अंतर मी ओलांडलं. काहीसं विस्मरणात गेलेलं आक्काचं चित्र अगदी डोळ्यांपुढे स्पष्ट उभं राहिलं. तशी ही आक्का आमच्या नात्यातली नव्हती की शेजारीणही नव्हती. पण एक-दोन दिवसांआड आक्काचा फेरा आमच्या घरी असायचा. आक्का आली की थेट स्वयंपाकघरात घुसायची. तिचा आवाज भसाडा आणि किंचित घोगरा. आधी वीज चमकते आणि मग गडगडाट ऐकू येतो हा शास्त्रातला नियम आक्कानं पार धाब्यावर बसवला होता. ती कोपऱ्यावरून आमच्या घराकडे वळली की आधी तिचा भसाडा आवाज ऐकू येई, मग पाच मिनिटांनी तिचं प्रत्यक्ष दर्शन घडे. माझी आजी तर तिला "अंबाबाईचा घाट"च म्हणायची. तसं आक्काचं दिसणं, वागणं, बोलणं सगळंच जगावेगळं होतं. आक्का बालविधवा होती आणि ती सुद्धा सोवळी. पण अशा दयनीय परिस्थितीत सापडलेल्या त्या काळच्या स्त्रीचं जे चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं, त्यापेक्षा आक्का फार वेगळी होती. ती कधी लाल आलवण नेसायची नाही की कधी खाली मान घालून रस्त्यानं चालायची नाही. ती नेहमी गर्भरेशमी माहेश्वरी साड्या नेसे किंवा टोपपदरी इरकल तरी ! अंगात चोळी कधी नसायची, पण गळ्यात पाच पदरी सोन्याचा चकचकीत गोफ असायचा. दोन-तीन बोटांत अंगठ्या आणि डाव्या हातात वजनदार सोन्याचं कडं. आक्काच्या नाकाडोळ्यांबद्दल न बोललेलं बरं. तिच्या एक डोळ्यात फूल पडलेलं होतं आणि दुसरा डोळा तिरळा होता. नाक होतं सांडगा घातल्यासारखं आणि ती ते बोलताना आणखीच फेंदरायची. वर्णानं आक्का गोरीही नव्हती आणि काळीही नव्हती. उंचीनं बेताची आणि आडव्या अंगाची, पण रूपाची सगळी कसर आक्का अर्वाच्य बोलण्यानं भरून काढी. आक्काचा आवाज जसा नंबरी होता, तसा शिव्यांचा संग्रहही जबरदस्त होता. ती म्हणजे अस्सल कोल्हापुरी शिव्यांचा चालता बोलता शब्दकोशच ! बोलताना प्रत्येक दोन-तीन शब्दांआड ती एखादी शिवी हासडायची. विशेषतः ती कुणाशी भांडायला लागली म्हणजे तिच्या प्रतिभेला अगदी ऊत यायचा. मूर्ख, कार्टा, हरामखोर असल्या पेदरट ब्राह्मणी शिव्या आक्काच्या तोंडातून कधी निघायच्या नाहीत. "तुझं मढं बसवलं", "तुझी तिरडी आवळली", "तुला आईसाहेबाच्या घाटावर नेऊन जाळलं (कोल्हापूरचं स्मशान)" इथं आक्काचं भांडण संपायचं. तिच्या या भडिमाराला घाबरून तिचे शेजारीपाजारी, नातेवाईक, तिचं खंडकरी सुद्धा गप्प बसत. मला तर ती कधी 'सिंधू' म्हणायची नाही. 'शिंदळीची' किंवा 'सटवी' ही तिची आवडती नावं होती.

आक्का एकदा बोलायला लागली की तिला भीड, मर्यादा राहायची नाही.

आक्काची अशीच एक गोष्ट मला आठवतेय. आक्का सोवळी होती. साहजिकच तिला केशवपन करण्यासाठी न्हावी बोलवायला लागायचा. असंच तिनं एका न्हाव्याला बोलवून आणलं. तो आक्काला म्हणाला, "मी चार आणे घेईन, आधीच सांगतो." आक्का कमरेवर हात ठेवून त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, - "अरे चार आणेच कशाला, सव्वा रुपाया देते, पाट मांडते, वर खण घालते, सव्वाशेर धान्य देते, माझं जावळच काढायचं आहे." तो न्हावी आपली धोपटी घेऊन पळाला. तो पुन्हा आक्काच्या दाराशी आला नाही. आक्काचं हे वक्तव्य माझ्या आजीपर्यंत गेलं. तिला आक्काचं असलं अर्वाच्य बोलणं अजिबात आवडायचं नाही. आक्का आल्यावर आजी तिला रागावून म्हणाली "आक्का, असलं बोलणं बायकांच्या जातीला शोभत नाही." आक्का इतकी तोंडाळ, पण आजीपुढं ती गप्प असे. "थोडी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी माणसानं," आजी पुढे बोलली. आक्का शांत होती. ती खालच्या आवाजात, आणि पाणावलेल्या डोळ्यानं म्हणाली, "नवरा मेल्यावर माझ्या बापानं माझं डोकं न्हाव्याच्या हाती दिलं, तेव्हाच सगळी लाज, भीड, मर्यादा जळून खाक झाली." इतकं बोलून आका उडून गेली, पण आजीच्या डोळ्यांत पाणी तरारलं.

आक्काच्या घरात बैठकीच्या खोलीत एक मोठा फोटो टांगला होता. डोक्याला पगडी, अंगावर उपरणं, कपाळावर गंध, आकडेबाज मिशा आणि चेहेऱ्यावरचा खत्रूड भाव हे त्या फोटोचं वैशिष्ट्य. या बैठकीच्या खोलीतच दाराशी एक काळ्या शिसवी लाकडाचा आणि पितळेच्या कड्या असलेला झोपाळा टांगला होता. त्या झोपाळ्याच्या समोरच्या भितीवरच तो फोटो लटकत होता. त्या फोटोतल्या माणसाचा उल्लेख आक्का नेहमी "मुडदा" असा करे. मला सुद्धा ते आवडायचं नाही. मी एकदा तिला म्हटलं, "या पट्टणकोडीकर इनामदारांना नेहेमी तू मुडदा का म्हणतेस? बरं नाही दिसत ते."

आक्का उसळून म्हणाली, "त्या मुडद्याला मुडदा नको म्हणू तर काय रावबहादूर म्हणू? मेल्या खोकडानं माझ्या जन्माचं वाटोळं केलं आणि ही सटवी मला शहाणपण शिकवतये. मेल्या खोकडानं माझ्या जन्माचं वाटोळं केलं."

मी देखील जरा धीटपणाने म्हणाले, "काय वाटोळं झालं ग तुझं? घरदार, दागदागिने, शेतीवाडी, पैसा-अडका, काही म्हणजे काही कमी नाही." आक्का फुणफुणत म्हणाली, "हा मुडदा पंचाहत्तर वर्षांचा! पहिल्या तीन बायका गिळून बसलेला. माझ्या बापानं चक्क पैसे घेऊन मला विकलं त्या म्हाताऱ्याला. आणि या निर्लज्ज खोकंडानं माझे काय धिंडवडे काढले ते माझं मला माहीत! अगं, बारा-तेरा वर्षांचं वय असेल माझं त्यावेळी. हा त्याचा फोटो बघितला तरी त्याचा गळा दाबावा असं वाटतं बघ." हे सगळं बोलताना ती संतापानं अगदी थरथरत होती. मी तिच्या पाठीवर हात ठेवला, तेव्हा ती हळूहळू शांत झाली. तसं तिच्या आणि माझ्या वयात तीस-चाळीस वर्षांचं अंतर असेल. पण तिला मन मोकळं करायला जवळचं असं कोणीच नव्हतं. तिच्या फटकळ आणि अर्वाच्य बोलण्यानं शेजारच्या बायकाही तिच्याकडे फारशा येत नसत. त्यामुळे ती माझ्यापुढे आपलं मन मोकळं करी. तिच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळी मला फारसा समजायचा नाही. मी फक्त श्रोत्याचं काम करी.

आक्काला माझी वेणी घालायला फार आवडायचं. माझे केस खूप जाड आणि लांब होते. वेणी घालताना ती अखंड बडबडत असायची. तिचा बाप, तिचा नवरा, तिची खाष्ट नणंद हेच तिच्या बोलण्याचे विषय असत. सुट्टीच्या दिवशी बेसनाच्या लाडवाचं आमिष दाखवून ती मुद्दाम मला बोलावून घेई. मग एका वाटीत तेल घेऊन माझ्या डोक्याला चांगलं चोळे आणि जटा काढून घट्ट वेणी घाली. मी लहान होते त्यावेळी मी हे तेल चोपडणं मुकाट्यानं सोसून घेई. पण मोठी झाल्यावर ते तेल आणि घट्ट वेणी हे दोन्हीही मला आवडेनासं झालं. एक दिवस भी जरा पुश्शातच तिला म्हटलं, "माझ्या डोक्याला इतकं तेल नको बाई फासूस, नाहीतर मी येणारच नाही वेणी घालायला."

आक्कानं माझे केस आपल्या हातात धरले होते आणि ती कुठंतरी हरवली होती. माझे शब्द कानावर पडल्यावर ती एकदम भानावर आली. माझ्या पाठीवर एक जोराचा धपाटा मारला आणि मला दूर ढकलून दिलं. तेलाची वाटी बाजूला करीत ती म्हणाली, "सटवे, मी काही तुझ्या बापाचं देणं लागत नाही, तुझ्या टाळक्यावर वाटीभर तेल जिरवायला. उठ चालती हो. माझा एवढा आनंद सुद्धा बघवत नाही दैवाला." ती खिडकीशी जाऊन उभी राहिली आणि माझ्याकडे न बघताच म्हणाली, "तुझे केस हातात घेतले की मला माझ्या केसांची आठवण येते गं! असेच होते बघ, लांब आणि जाड. पण त्या केसांना कधी ठिपकाभर तेल मिळालं नाही की त्यावर प्रेमानं कधी कुणाचा हात फिरला नाही." इनामदारांच्या फोटोकडे हात दाखवून पुढं म्हणाली, "हा मुडदा मेल्यावर सहा महिन्यांतच माझ्या बापानं अगं बाप कसला, कसाईच तो - माझं डोकं भादरून मला सोवळी करायचा चंग बांधला. मी पुष्कळ रडले, भेकले, पण त्या कसायाला पाझर फुटला नाही. माझे हात-पाय बांधून आणि माझ्या तोंडात बोळा कोंबून त्या मेल्यानं माझं डोकं न्हाव्याच्या हातात दिलं. सोळा, सतरा वर्षांची असेन बघ मी त्यावेळी. रडून आकांत केला पण काही उपयोग झाला नाही." इतकं बोलून आक्का ढसाढसा रडू लागली. तिचा तो आकांत बघून मी म्हटलं, "आक्का, मुडदा कसा मरेल गं?" माझा प्रश्न ऐकून ती अगदी गडगडा हसली आणि डोळ्यांतलं पाणी पुशीत ती म्हणाली, "ढालगज भवानी मेली!" आक्काचं ते हसणं तिच्या रडण्यापेक्षाही हृदय पिळवटून टाकणारं होतं. आक्काच्या आयुष्यातला एकेक प्रसंग मला तिच्या अधिक जवळ नेत होता.

आक्काचा आणखी एक शौक म्हणजे निरनिराळे पदार्थ तयार करणं आणि ते सगळ्यांना पोटभर खाऊ घालणं. साजूक तुपातले बेसनाचे लाडू, निरनिराळ्या वड्या, ह्या वस्तूंनी तिचे डबे सदैव भरलेले असत. शिवाय खारका, बदाम, बेदाणे, काजू असा सुकामेवाही काचेच्या बरण्या भरभरून ठेवलेला असे. यांतलं ती स्वतः फारच थोडं खाई. गल्लीतली मुलं, शेजारीपाजारी, येणारे जाणारे या सर्वांना ती हे जिन्नस उदार हस्ताने वाटून टाकी. तिच्या या उदार स्वभावामुळेच तिच्या शिव्या, शेजारी-पाजारी मुकाट्यानं ऐकून घेत आणि तिचं भांडणं फारसं मनावर घेत नसत. एकदा दुपारच्या वेळी मी आजीचा काही निरोप घेऊन तिच्याकडे गेले होते. आक्का हात पुसत पुसत स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, "आत्ताच बेसनाचे लाडू केलेत. बस झोपाळ्यावर दोधी मिळून खाऊ या. मग आकानं दोन चांदीच्या वाट्यांत लाडू घालून आणले आणि आम्ही दोघी झोपाळ्यावर बसून खायला सुरुवात केली. मी लाडू खाण्यात इतकी गुंग झाले होते की आकाकडं माझं लक्षच नव्हतं. एकदम कानावर शब्द आले "मेल्या, आत्ता कसं वाटतंय? तेव्हा सगळ्या जिनसा कुलपांत ठेवून एकटा एकटा खायचास. आता बस मुडद्या हात चोळीत."

बघितलं तर इनामदारांच्या फोटोकडे बपून आका स्वतःशीच बोलत होती आणि हसत होती. मी तिला गदगदा हलवून विचारलं, 'अगं ए! कुणाशी बोलतीस?" आका म्हणाली, "अगं या खोकडाशी. लाडू, पेढे, सुकामेवा, सगळं काही मेला कुलपात ठेवायचा आणि एकट्या एकट्यानं खायचा. पुन्हा किल्ली सदैव जानव्याला. एक लाडू कधी मेल्यानं हातावर ठेवला नाही. दिवसभर काम करून भूक लागायची. ती माझी नणंद - हडळ मेली - पोटभर जेवायलाही द्यायची नाही. असं वाटायचं की या थेरड्याचा गळा दाबावा आणि सगळा डबा हिसकावून घ्यावा. अगं, लाडू वळता वळता मी हळूच एक लाडू तोंडात टाकला तर त्या दोघांनी मला डाग दिला होता. आता माझी वासनाच गेली आहे, पण त्या कंजूष थेरड्याची खोड मोडायला मी हा उपद्व्याप करते." आक्काच्या वाटीतला लाडू तसाच होता. गतकाळातल्या वेदनांचे वण अजूनही ठणकताना दिसत होते. एकीकडे मी गलबलून गेले होते. दुसरीकडे म्हाताऱ्यावर सूड उगविण्याच्या तिच्या कल्पनेचं हसू येत होतं.

आक्काचं बालपण खेडेगावातच गेलं. घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि दर वर्षाला येणारी आईची बाळंतपणं यांमुळे आक्काचा आणि शिक्षणाचा कधी संबंधच आला नाही. ती अशिक्षित असली तरी बुद्धिमान होती. तिचे विनोदच तिच्या बुद्धीची साक्ष देत. गल्लीतल्या निम्म्या लोकांना तिनं टोपणनावं दिली होती. वामनराव हसबनीस वकिलांना ती गंगाधरपंत म्हणे कारण, त्यांनी ठेवलेल्या सोनारणीचं नाव गंगुबाई होतं. देसाई इनामदारांना ती फॅगडू इनामदार म्हणे कारण, ते फेंगडे चालत, तर काळे मास्तरांना ती बालगंधर्व म्हणे, कारण ते बाईसारखे हावभाव करीत. माझ्या आजीला ही आनंदस्वामी म्हणे, कारण तिचं नाव आनंदी आणि स्वभावानं फार शांत आणि सोज्वळ ती नकलाही फार छान करी. एखादी हकीगत सांगताना त्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आवाजासारखा आवाज ती काढे, जणू काही एखादा एकपात्री प्रयोगच ! आका अक्षरशत्रू असल्याने वाचनाचा वगैरे काही प्रश्नच नव्हता. आकाचं एकमेव करमणुकीच साधन म्हणजे सिनेमा ! देवधर्माच्या वाटेला ती फारशी जायची नाही. तिला फिअरलेस नादियाचे स्टंटपट फार आवडत. आजीला 'संत तुकाराम बघायला जातो' असं सांगूर आम्ही 'हंटरवाली' बघायला जात असू. 'तुफान मेल' तर आम्ही चार वेळा बघितला होता. सिनेमा बघताना ती इतकी तन्मय होई की आपण थिएटरमध्ये आहोत हे विसरूनच जाई. खलनायकाला शिव्या घालणं, त्याच्या नावाने बोटं मोडणं, मारामारी सुरू झाली की उभं राहून हातवारे करणं, हे प्रकार ती बिनदिक्कत करी. घरी आल्यावर देखील ती दोन-तीन दिवस त्या सिनेमाच्याच जगात असे. मला सारखं सांगायची, "त्या संत सखूसारखी नाहीतर त्या तुकोबासारखी पेदरट होऊ नकोस. हंटरवाली हो हंटरवाली. आणि बाकी तुझी आजी कसली तुला हंटरवाली बनवणार. तू होणार तिच्यासारखी पेदरट." तिला 'कुंकू' सिनेमा फार आवडे. तो बघताना तिला रडू आवरायचं नाही.

आक्का नवऱ्याचा उल्लेख अखंड 'मुडदा' असा करायची, पण इनामदारांचं श्राद्ध लाडू अगदी साक्षेपानं करायची. ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा द्यायची, पुरणपोळीचं जेवण असायचं आणि सगळ्या शेजारीपाजारी लोकांना जेवायला बोलवायची. एकदा माझ्या मामानं त्याबद्दल तिला विचारलं तर हसत म्हणाली, "अरे, मनातल्या मनात तो मेल्याचा आनंद मी साजरा करते". मग हळू आवाजात म्हणायची, "त्याच्या पैशावरच मी राणीसारखी राहते ना, मग थोडं नको का ते स्मरायला?"

आक्काचा सगळ्यात आवडता दिवस असायचा हादगा बोलावणीचा. आक्काच्या घरी हादगा नाचायच्या वयाची कोणीही मुलगी नव्हती. केवळ हौस म्हणून ती हा समारंभ करायची. गल्लीतल्या सगळ्या मुलींना आणि माझ्या मैत्रिणींना ती आवर्जून फेर धरायला बोलवी. त्या आधी आठ दिवस तिची ह्या समारंभाची तयारी चालायची. या दिवसांत ती लहानाहून लहान व्हायची. अखंड नव्या नव्या खिरापतीबद्दल आणि हादग्याच्या गाण्यांबद्दल बोलत असायची. नवी, कुणाला न ओळखणारी खिरापत कोणती करायची, याबद्दल तिचा सारखा विचार चालू असे. त्या दिवशी ती अंगण स्वच्छ करून घेई. मधोमध मोठी आणि सुबक हत्तीची रांगोळी काढी. फेर धरून मुली नाचायला लागल्या की एका कोपऱ्यात गम्मत पाहत बसे. मधून मधून मुलींच्या बरोबर गाणी म्हणे. खिरापत ओळखायला मुली हरल्या की आनंदाने टाळ्या वाजवी. फेर संपल्यावर सगळ्या मुलींना आग्रह कर करून जेवायला वाढी. त्या दिवशीची आक्का अगदी वेगळीच असायची. एकदा सगळ्या मुली घरी गेल्यावर मी आणि अक्का दोघीच घरात राहिलो. ती दिवसभराच्या दगदगीने खूप दमली होती. मी तिला म्हटलं, "तुला होत नाही तर कशाला इतकी धडपड करतेस?" जरा वेळ आक्का काहीच बोलली नाही. कुठंतरी हरवल्यासारखी दिसायला लागली, मग म्हणाली, "अगं! लहानपणी हादगा नाचायची मला फार हौस. सगळ्या मैत्रिणींच्या घरी मी आवर्जुन जायची. पण मला कधी कोणाला बोलवता आलं नाही घरी! दोन वेळा जेवायला मिळायची मारामार तर खिरापत कुठली देणार? मी निर्लज्जपणानं मैत्रिणींच्या घरी जायची. पण मनात ओशाळल्यागत व्हायचं. आत्ता माझ्या घरी फेर धरून नाचणाऱ्या मुलींच्या जागी मला माझी लहानपणातली एकेक मैत्रीण दिसते. त्यांनाच जेवायला घातल्याचं समाधान मिळतं. या आनंदासाठी तर मी वर्षभर या दिवसाची वाट बघत असते." आक्काकडून मी घरी आले तरी आक्काच्या वागण्याचाच विचार करीत होते. त्यावेळी मी असेन १२-१३ वर्षांची. आक्काचं बोलणं, वागणं, याचा अर्थ मला फारसा समजायचा नाही; पण आता लक्षात येतं की तिच्या, वरकरणी विसंगत वाटणाऱ्या वागण्यातही एक संगती होती. तिचा तोंडाळपणा आणि शिवराळपणा हा तिच्या दबलेल्या भावनांचा आणि सोसलेल्या मनस्तापाचा आविष्कार होता.

मी आजोळहून माझ्या आईवडिलांच्याकडे राहायला गेले आणि आक्काचा सहवासही संपला. मनात घर करून राहिल्या त्या तिच्या सहवासाच्या आठवणी. माझं लग्न झाल्यावर ४-५ वर्षांनी मला आक्का गेल्याचं कळलं. बालपणीच्या सुखद आठवणींचा एक धागा तुटला होता.

आक्का बालविधवा असली तरी निरांजनाची ज्योत वगैरे नव्हती. कोणत्याही सामाजिक चालीरितींच्या दबावाखाली ती दबली गेली नाही. तिला जो आनंद हवा होता तो तिनं कोणालाही न जुमानता मिळविला. रडत भेकत आपल्या नशिबाला दोष देत तिनं खाली मान घालून आयुष्य घालविलं नाही. लहानपणी तिच्या वाट्याला आलेले भोग तिनं भोगले. त्या दुःखानं व्याकूळही झाली, पण वाट्याला आलेली समृद्धी आणि सुख यांचाही तिनं उपभोग घेतला. इतरांनाही समृद्धीतून मिळालेला आनंद वाटला. आक्का कधी दीनवाणी दिसली नाही. ती होती एक पेटती मशाल, धगधगणारी, भडकणारी, पण आत कुठंतरी कणाकणानं जळणारी !