तर कधी येऊ भेटायला?

आमचे साहेब तुमची खूप इज्जत करतात आणि तुम्हाला भेटण्याची त्यांची  इच्छा आहे. तुम्हाला कदाचित त्यांच्याविषयी फारशी माहिती नसेल.  म्हणून थोडी ओळख. 

मोठ्या लोकांच्या शिफारसपत्रांच्या आधारावर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्वीच बंदूक बाळगण्याची परवानगी दिली आहे. आजपर्यंत त्यांनी एक-दोन अपवाद वगळता कधीही गोळी झाडलेली नाही. फक्त एकदा एक जण अगदीच अंगावर आला म्हणून स्व- संरक्षणार्थ त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला कायमचे जायबंदी केले आहे. त्यातही एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सरळ डोक्यात किंवा छातीवर गोळी झाडणे शक्य असूनही त्यांनी तसे केले नाही यावरून त्यांची थोरवी लक्षात येते. चर्चा करताना अधे-मधे खिशातील बंदूक काढून तिच्या नळीच्या टोकावर हलकीशी फुंकर मारायची आणि बंदूक परत खिशात ठेवायची अशी त्यांची जुनी सवय आहे. पान खाऊन पचापच थुंकणाऱ्यांच्या सवयीकडे जसे तुम्ही  दुर्लक्ष करता तसे या सवयीकडे दुर्लक्ष करा आणि चर्चा चालू ठेवा.

दुर्गादेवीचे आणि महालक्ष्मीचे उपासक जसे महत्त्वाचे तसेच सरस्वतीचे उपासकही महत्त्वाचे आहेत असा त्यांचा दृष्टीकोन आहे. तुमच्यासारख्या अनुभवी आणि ज्ञानी व्यक्तीबरोबर चर्चा करायला त्यांना फार म्हणजे फारच आवडते. तुम्हाला कदाचित आवडत नसेल याची त्यांना कल्पना आहे. पण तुमच्या आगामी पुस्तकाच्या काही शे प्रती आगाऊ रक्कम देवून विकत  घेतल्या तर त्यांना भेटण्याची इच्छा तुमच्यामध्ये आपोआप जागृत होईल हेही त्यांना माहीत आहे. माहिती जमा करून तिचा यथायोग्य उपयोग करणे हे ऍमेझॉन आणि गूगल देखील करते. त्यांच्यावर कोणी ब्लॅकमेलिंगचा आरोप करत नाही. साहेबांवर मात्र खोट्या केसेस दाखल करून विनाकारण मनस्ताप देणारे हितशत्रू आजूबाजूलाच आहेत. पण त्यांना पुरून उरलेले साहेब अजून बाहेर आहेत आणि ते "आत” जाण्याची काहीही शक्यता नाही  ही  गोष्ट  हायकोर्टाला देखील माहीत आहे.

बोलण्याचा भरात थोडी जास्तच माहिती दिली. खरं तर त्याची काही गरज नव्हती.  तुमच्यासारखी लोकं नुसत्या एका निरोपावर भेटायला येतात. तेव्हा साहेब स्वतः खाली उतरून एखाद्याला भेटायला जातात म्हणजे एक आश्चर्यच आहे. पण त्यातही त्यांचा काही विचार असेलच. परिसराची रेकी करायची, घरच्यांशी घसट वाढवायची, शेजारी-पाजारी संपर्क ठेवायचा ही कामे पंटर लोकांवर सोपविता येत  नाहीत. 

तर कधी येऊ देत भेटायला?

प्राणीप्रेमाचा कडेलोट

रस्त्यावरच्या कुत्र्या-मांजरांना खाऊ घालणारे प्राणीप्रेमी खूप पाहिले आहेत. पण खाली लिहिलेलं काही झेपलं नाही बुवा आपल्याला.

माझ्या या सर्व बाळांना मला बिलगून, म्हणजे माझ्या कुशीत, नाहीतर माझ्या डोक्याशी, पायांशी अथवा पोटावर किंवा किमान हाताला चिकटून झोपायचं असतं. ते एकाच वेळी शक्य नसल्यानं मी एक शक्कल लढवलीय. त्या २९ जणांना मी झोपण्यापुरतं तीन बॅचेसमध्ये विभागलंय. दहाची पहिली बॅच रात्री दहा ते साडेबारा या वेळात माझ्याशेजारी डबलबेडवर विसावते. साडेबाराला त्यांना हलवून एका खोलीत बंद केलं की साडेबारा ते पहाटे तीन दुसऱ्या तुकडीचा हक्क. शेवटी तीन ते साडेपाच तिसरा ग्रुप! आधी मी गजर लावून ही अदलाबदल करत असे. आता आपोआप जाग येते. ही तडजोड आता त्यांच्याही अंगवळणी पडलीय. 

https://www.loksatta.com/chaturang/soyare-sohchar-cats-dogs-extreme-love-animal-love-ysh-95-2978458/

हॉटेलमध्ये जुगार खेळल्याप्रकरणी नऊ जणांना सहा महीने कारावास

Loksatta 7 June 2022
मुंबई शहर आवृत्ती

अकरा वर्षांपूर्वीचे पंचतारांकित हॉटेलमधील प्रकरण
लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबईः अकरा वर्षांपूर्वी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत जुगार खेळल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नऊ व्यावसायिकांना नुकतेच दोषी ठरवून त्यांना सहा महिन्यांचा तुरूंगवास आणि प्रत्येकी दोन हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

महानगर दंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी आरोपींना चांगल्या वर्तनाच्या आधारे जातमुचल्क्यावर सोडण्यास नकार दिला. त्याऐवजी न्यायालयाने त्यांना शिषा सुनावली. ताज प्रेसिडेंट हॉटेलमधील एका खोलीत काही लोक रमी खेळत असल्याची माहिती २०११ मध्ये तत्कालीन साहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना मिळाली होती. त्यांनी आणि त्यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकून आरोपींकडून ३.२५ लाख रुपये जप्त केले होते.
पोलिसांच्या आरोपानुसार, व्यावसायिक अश्विन भन्साळी आणि संदीप चाळके हे २७ ऑगस्ट २०११ रोजी हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरील खोलीत थांबले होते. तर व्यावसायिक नरेश येल्डी, सुरेश साबुला, केतन शहा, श्रावण जैन, रमेश राठोड, मनोज जसानी आणि राज फड हे रमी खेळण्यासाठी तेथे गेले होते. हॉटेलची खोली भन्साळी आणि चाळके यांनी रमी खेळण्यासाठी घेतली होती.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रत्येकाकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यात २७० रुपयांपासून १.२० लाख रूपयांच्या रकमेचा समावेश होता. मुद्देमाल म्हणून खोलीतील टेबलावर ठेवलेले पत्त्यांचे दोन संच, नोंदी असलेली एक वही जप्त करण्यात आली. या प्रकरणी कफ परेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्यादरम्यान आरोपींनी ते निर्दोष असल्याचा दावा केला होता. तसेच या प्रकरणी पोलिसांनी पंच साक्षीदारांसह केवळ पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकाचा जबाबही नोंदवलेला नाही. असा युक्तिवाद केला होता. न्यायालयाने निर्णय देताना आरोपींचा युक्तिवाद फेटाळून लावला. सरकारी पक्षाचे बहुतांशी साक्षीदार हे पोलीस खात्यातीलच होते म्हणून त्यांची साक्ष विश्वासार्ह नाही, असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासाच्या पद्धतीचेही न्यायालयाने कौतुक केले. छापा योग्य पद्धतीने टाकला गेला. त्याआधीचे तपशील आणि त्यानंतरचे पंचनामे, प्रत्येक आरोपीचा जबाब, त्यांचे गुन्ह्यातील सहभागाबाबतचे स्पष्टीकरण, तपशीलवार प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) याआधारे पोलिसांनी त्यांचा खटला भक्कम केला, असेही न्यायालयाने म्हटले.
सरकारी पक्षाच्या सगळ्या साक्षीदारांच्या साक्षीची पडताळणी केल्यानंतर त्यावर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. याउलट आरोपींनी जुगार खेळण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली घेतली होती. छाप्याच्या वेळी त्यांच्याकडून मोठी रक्कम हस्तगत कर्ण्यात आली होती. या बाबी त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यासाठी पुरेशा असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले.