जगणं नव्याने जगताना कॅन्सरयोद्ध्यांचा प्रेरणादायी प्रवास

मी १९७५ मध्ये पुण्यात एका ख्यातनाम संशोधन संस्थेत संशोधन कार्यासाठी दाखल झालो आणि जानेवारी २०१३ला शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालो. निवृत्तीपूर्वी साधारण दोन वर्षांपासून निरनिराळ्या प्रकल्पांची कामं पूर्ण करण्यासाठी धावपळ आणि त्यासाठीच्या मीटिंग यातून जेवणाच्या वेळा पाळल्या जात नसत. भरीला प्रोजेक्ट साईटच्या टूर त्यातून अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू झाला. कामाच्या व्यापातून हे होणारच, असं वाटायचं. निवृत्तीच्या साधारणपणे एक वर्ष आधीपासून मला पहिला घास गिळताना ठसका लागायचा. आपल्याला गिळताना त्रास होतो, हे जाणवत होतं, पण तिकडे दुर्लक्ष झालं. 

लहानपणापासून प्रत्येक पदार्थ म्हणजे चजा चहा, कॉफी, भात, भाजी, पोळी सगळंच गरम का खाण्याचा माझा अट्टाहास होता. त्यामुळे कदाचित अन्ननलिकेच्या आतील आवरणाचा दाह होत गेला असावा. असा निष्कर्ष निघाला.  कामाच्या स्वरूपामुळे सर्वत्र परिपूर्णतेचा ध्यास, तसंच नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात कामाचा व्याप, जेवण आणि झोपेतली अनियमितता यांमुळेच अ‍ॅसिडिटी आणि GERDचा उगम झाला असावा, असं वाटतं. कमी झालेले हिमोग्लोबिन आणि जोडीला उच्च रक्तदाब हे सर्व लक्षात येऊनही तब्येतीकडे दुर्लक्ष झालं आणि शेवटी तेच भोवलं.

पुस्तकाचे नावः जगणं नव्याने जगताना: कॅन्सरयोद्धयांचा प्रेरणादायी प्रवास

शब्दांकनः ऐश्वर्या तानाजीराव भोसले