लेखकः व्यंकटेश माडगूळकर
दुसरी आवृत्ती: १५ ऑगस्ट १९८५
पाटलीण म्हणाली, "बरं झालं. दंगल होऊन गेल्यावर आला."
बारीक कापऱ्या आवाजांत आई बोलली, "त्याचं नशीबच तसे आहे. संकट टळलं म्हणजे तो हजर होतो. कांही वाईट बघणं त्याला ठाऊकच नाही."
हातातली पिशवी भिंतीला टेकवून ठेवून मी धान्याने भरलेल्या पोत्यावर बसलों.
"मी नांदवडींतच होतों."
" कळलं तें आम्हांला. तुम्ही वाटेवर असाल तेव्हाच इथं गावांत माणसं घुसलीं नि शांतपणाने दुपारपर्यंत तीं घरें पेटवीतच हिंडत होतीं."
"परगावचींचं माणसं का इथलीं होतीं ?"
आई म्हणाली, "काय सांगायचं बाबा? सगळी माणसं माझ्या माहेरचीं कटफळचीं. सगळे ओळखीचेच लोक होते. आपल्या घरावर आले तेव्हा मी म्हणालें, 'अरे बाबांनो, ओळखपाळख अगदीच कशी विसरलां ? आपल्या बहिणीचं घर जाळतां का?' तर एक पोरगा म्हणतो कसा, 'आक्का, तूं बाजूला हो. दहा जणांची घरं जाळलीं. तुझं एकल्याचंच कसं ठेवावं ?'"
आई पुढे कांही सांगणार होती. तेवढ्यांत पाटलीण म्हणाली, "कशाला आल्याआल्या ती करमगती? च्याफ्या प्या म्हनं. अंगुळी करा."
मी विचारलें, "आबा कुठं गेलेत ?"
पानः १०६