डॉ. माधव पुटवाडी
(प्राध्यापक, मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ)परंपरेने चालत आलेली जातव्यवस्था आणि अंधश्रद्धांच्या कचाट्यातून सर्वसामान्य जनतेची सुटका करणे आणि त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणे, हा वारकरी संप्रदायातील सर्वच संतांचा उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र या संप्रदायाची सूत्रे आपल्या हाती घेऊन तथाकथित बाबा-बुवा-महाराजांनी स्वतःचाच उत्कर्ष साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. संतश्रेष्ठ तुकारामांनी अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांची झाडाझडती कशी घेतली आहे ते सांगणारा लेख-
जगातल्या ज्या-ज्या धर्माची किंवा पंथाची बदनामी झाली आहे वा होत आहे, त्याला त्या-त्या धर्माचे किंवा पंथाचे अनुयायीच सर्वाधिक कारणीभूत होते आणि आहेत.
स्वतःला धार्मिक समजणाऱ्या लोकांचा आरोप असा असतो की, निरीश्वरवादी व विवेकी लोक धर्माची बदनामी करत असतात; मात्र हे खरे नाही. निरीश्वरवादी व विवेकी लोक एका बाबतीत नक्कीच धार्मिक लोकांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात, ती बाब म्हणजे ते धार्मिक असल्याचे ढोंग करत नाहीत. लोक धार्मिक आहेत, हा मानवजातीपुढचा प्रश्न नाही. लोक धार्मिक असल्याचे ढोंग करत आहेत, धार्मिकतेच्या ढोंगाआड अधर्माचरण करत आहेत आणि भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धाभावाशी खेळत आहेत; हा खरा आणि गंभीर प्रश्न आहे. त्याला ज्या धर्माचे वा धर्मपंथाचे अनुयायी असल्याचे लोक सांगतात, त्या धर्माचे वा धर्मपंथाचे मूळ तत्त्वज्ञान व्यवहारात असणारा आणि धर्माने वा धर्मपंथाने सांगितले आहे तसे तंतोतंत वागणारा मानवसमूह पृथ्वीच्या पाठीवर कुठेच नाही. भूतकाळातही नव्हता आणि भविष्यातही असणार नाही. जर असेलच, तर व्यक्तीचा अपवाद असू शकतो.
या प्रयत्नात जे स्वतःला हिंदू धर्माचे किंवा हिंदू धर्मातील एखाद्या पंथाचे अनुयायी समजतात ते लोक वेदांतील तत्त्वप्रणालीस प्रमाण न मानणाऱ्या व देव-दैववादी नसणाऱ्या लोकांना नास्तिक म्हणत असतात. त्यांच्या दृष्टीने नास्तिक लोक धर्मभ्रष्ट असतात. धर्मभ्रष्टतेमुळे ते महापातकी झालेले असतात. मृत्युनंतर ते नरकात जातात.
जे धार्मिक असल्याचे ढोंग करतात ते लोक स्वतःला आस्तिक समजत असतात. त्यांचा असा गैरसमज असतो की, ते धर्मपरायण आणि ईश्वरोपासक आहेत. ते धर्मप्रामाण्यवादी असल्यामुळे पुण्यवंत आहेत आणि त्यामुळे मृत्यूनंतर ते पुण्यलोकात म्हणजेच स्वर्गात जाणार आहेत. वस्तुतः, हा त्यांचा भ्रम आहे.
तात्पर्य, बदललेल्या काळाची व सभोवतालाची जाणीव न ठेवता अविवेकीपणे एखाद्या धर्मग्रंथाला प्रमाण मानण्यात कोणत्याच प्रकारचे शहाणपण नाही. मग तो धर्मग्रंथ कोणत्याही धर्माचा असो, तो कितीही प्राचीन असो आणि कोणीही लिहिलेला वा सांगितलेला असो.
अर्थात, 'माणूस म्हणजे विचार करणारा प्राणी होय,' हे विशेषण मिरवणाऱ्या माणसासाठी त्याने ग्रंथप्रामाण्यवादी नि देवदैववादी असणे ही बाब गौरवाची ठरत नाही. उलट प्रयत्नवादी आणि विवेकवादी असणे ही बाबच 'माणूस' असण्याची खरी खूण जपणारी जपणारी आहे. इथे आपणास हिंदू धर्माचा एक भाग असणाऱ्या आणि भागवत संप्रदाय ते वारकरी संप्रदाय असा प्रवास करत आलेल्या वारकरी संप्रदायाची चर्चा करावयाची आहे. ती चर्चा संत तुकारामांच्या अभंगांच्या संदर्भाने करायची आहे.
संतांनी वारकरी संप्रदायाची उभारणी केली. परमार्थाचा एक लोकविलक्षण नवा मार्ग सांगितला. संतांनी सांगितलेला मार्ग साधा, सोपा आणि सोयीचा होता. बहुसंख्य लोकांना तो आचरणसुलभ वाटला. साध्यरूप वाटला. आवडला. हजारो लोक वारकरी संप्रदायाशी जोडले गेले. संत नामदेवांसाठी औंढा येथील नागनाथांच्या मंदिराचे दार फिरल्याची कथा खूप सूचक आहे. संतांनी इतिहास घडवला आहे, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही.
संतांनी त्यांच्या संप्रदायाचे म्हणून जे तत्त्वज्ञान सांगितले, ते चांगलेच आहे. त्यामुळेच बहुसंख्य लोक या संप्रदायाकडे वळले. संत नामदेवांनी पाया रचलेल्या या संप्रदायाचा संत तुकारामांच्या काळापर्यंत खूप विस्तार झाला होता. संत तुकारामांच्या दृष्टीने ही गोष्ट अतीव आनंदाचीच होती; परंतु या संप्रदायाच्या विचारांचे सत्त्व जपणेही तेवढेच आवश्यक असून सांप्रदायिकांची ती प्राथमिक जबाबदारी आहे, याचेही त्यांना भान होते. ही जाणीव संत नामदेव व इतर संतांनाही होतीच. सांप्रदायिकांनी काही पथ्य पाळावे व या संप्रदायाचे पावित्र्य नि सत्त्व जपावे हे अत्यंत तळमळीने त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.
या संप्रदायाच्या स्थापनेपासूनच संतांना तसे सांगावे लागले याचा अर्थ असा होतो की, अगदी प्रारंभापासूनच अनेक जण या संप्रदायाच्या तत्त्वाच्या विरुद्ध वागत होते. स्वतःला वारकरी म्हणवून घेणारे आणि वारकरी असल्याचे ढोंग करणारे अनेक जण सांप्रदायिक विचारांचे पावित्र्य जपत नव्हते. परिणामी संत नामदेवांपासून सगळ्या संतांना अशा ढोंग्यांवर टीका करावी लागली. संत तुकारामांचा काळही त्याला अपवाद नव्हता. स्वतःला वारकरी म्हणवून घेणाऱ्यांच्या अपप्रवृत्ती तुकारामांच्याही अनुभवाला आल्या आणि त्यांनी तशा प्रवृत्तींवर प्रहार केले. त्या दृष्टीने संत तुकारामांच्या पुढील अभंगांचा विचार करता येईल.
संतांनी विठ्ठलाला दैवत मानले. विठ्ठलभक्तीचा मार्ग प्रस्थापित केला. त्या मार्गाचे तत्त्वज्ञान सांगितले. ते तत्त्वज्ञान स्वतः आचरणात आणून त्या तत्त्वज्ञानाला सत्त्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. मात्र, अनेक ढोंगी वारकऱ्यांनी विठ्ठलालाही विकले. विठ्ठलभक्तीचा बाजार मांडून स्वतःची पोटे पोसली. कीर्तनासाठी पैसे घ्यायला सुरुवात केली. वारकरी संप्रदायाला बदनाम केले. अशा पोटार्थी लोकांवर संत तुकारामांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे-
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । शि यातिशीं कारण नाहीं देवा ॥
आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ।। (१२३)
'जो माणूस मुलीची, गाईची आणि हरिकथेची विक्री करतो तो माणूस दुर्जन समजावा. देवाला सद्गुणी माणूस प्रिय असतो. जो दुर्गुणी असतो तो अप्रिय असतो. देव माणसाचे गुण पाहतो. जन्म-जातं कोणती ते पाहत नाही. जी माणसे लोभी असतात ती अनुचित कर्म करतात आणि नरकात जातात. '
वरील अभंगात संत तुकारामांनी माणसांच्या हावरटपणावर आणि अहंगंडांवर टीका केली आहे. देवाला माणसाची जात नव्हे, तर गुण प्रिय असतो हे नोंदवले आहे. आपण जन्मानेच श्रेष्ठ आहोत असा अहंकार बाळगणाऱ्यांवर टीका केली आहे. विशेष म्हणजे जो कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे केल्याचे पैसे घेतो तो माणूस कमालीचा दुष्ट होय, असा निर्वाळा दिला आहे. कीर्तनासाठी पैसे घेणे म्हणजे पोटच्या मुलीला विकून पैसे घेतल्याइतके वाईट असल्याचे म्हटले आहे. अशा कीर्तनकाराला संत वा महाराज म्हणता येणार नाही, कारण ते कमालीचे चोडाळ असतात. अधम असतात.
संत तुकारामांनी म्हटले आहे- 'पैशाच्या आशेने कीर्तन करणारा कीर्तनकार आणि पैसे देऊन कीर्तन ऐकणारा श्रोता हे दोन्ही अधर्माचरणी नि महापातकी होत.' त्यांनी लिहिले आहे -
आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥
वायां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ।।
बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥
माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ।।
(६७९)
"वक्ता जर केवळ पैशाच्या लोभापायी कीर्तन करत असेल, तर श्रोता शांतचित्ताने ते कीर्तन ऐकेल कसा ? कारण श्रोत्याच्या मनात वक्ता पैसे किती मागेल ? याची काळजी असते. तशा भजनांतून दोघांच्याही हाती काहीही लागत नाही. कोणालाही काही फायदा होत नाही. बहिरा माणूस आणि मुका माणूस एकत्र येऊनही त्यांचा परस्परांना काहीही फायदा होणार नाही. कारण मुका बोलू शकत नाही आणि बहिऱ्याला ऐकू जाणार नाही. त्याच न्यायाने आशाळभूत वक्ता आणि लोभी श्रोता यांच्या एकत्र येण्याने कोणाचाही फायदा होणार नाही. त्यांचा सगळा हरिकथेचा उद्योगच निरर्थक आहे. गोणीतले धान्य बाहेर काढले आणि मापाने मोजून दुसरीकडे टाकले. आता मापही रिकामे आणि गोणीही रिकामी. त्याच न्यायाने लोभी वक्ता आणि श्रोता दोन्ही रिकामे असतात. त्यांचे जीवन व्यर्थ जाते.
संत तुकारामांचा वरील आशयाचा आणखी एक अभंग उपलब्ध आहे. त्यात त्यांनी लोभी वक्त्याला ज्ञान नसते, तर तो काहीतरी मिळेल म्हणून निरर्थक बडबड करत असतो. घरोघर फिरून पोट भरणाऱ्या लोभी मांजरासारखा तो तोंड वासून घरोघर भीक मागत फिरत असतो, फुकटचे खात असतो, असे म्हटले आहे. त्यांनी लिहिले आहे-
आशाबद्ध वक्ता । भय श्रोतियाच्या चित्ता ॥
गातो तें चि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥
जालें लोभाचें मांजर । भीक मागे दारोदार ।।
माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ।। (१४८२)
संत तुकारामांनी म्हटले आहे- 'कीर्तन, भजन, प्रवचन वगैरेसाठी पैसे घेणारे तथाकथित संत, साधू, कीर्तनकार, भजनी, प्रवचनकार हे लोक जेवढे पातकी असतात तेवढेच त्यांना पैसे देणारे लोकही पातकी असतात.' त्यांनी लिहिले आहे-
त्या हरिदासांची भेटी घेतां । नर्का उभयतासी जातां ॥
माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥
देतां घेतां नरकवासी उभयतांसी रवरव ।।
तुका म्हणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ।। (४०३३)
'जे लोक पैशासाठी कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे करतात आणि जे लोक कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे करणाऱ्यांना पैसे वा इतर स्वरूपात मोबदला देतात ते घेणारे नि देणारे दोघेही नरकात जातात. एवढेच नाही, तर तशा हरिकथेसाठी पैसे देणाऱ्यांचे आणि पैसे घेणाऱ्यांचे तोंडही पाहू नका. कारण, त्यांचे तोंड पाहणेही पापकर्म ठरते. त्यांचे तोंड पाहणारेही नरकात जातील. हरिकथा ही बाब जन्मदात्या आईपेक्षाही थोर असते. हरिकथेसाठी पैसे घेणे म्हणजे स्वतःची आई उपभोगार्थ दुसऱ्याला देऊन त्याच्याकडून पैसे किंवा मोबदला (भाड) घेण्याइतके वाईट आहे. तेव्हा कीर्तन, भजन, प्रवचन वगैरेसाठी कोणाकडूनही पैसे घेऊ नका आणि कोणाला पैसे देऊ नका. कारण, अशी देवघेव करणाऱ्यांचा नक्कीच अधःपात होईल. अशी नीच व लोभी माणसे नरकात पडतील.
संपत्ती जमवावी, पण ती चांगल्या मार्गाने. त्या संपत्तीचा उपभोग घ्यावा. माणुसकी जपत आनंदाने जगावे, ही संत तुकारामांची स्वच्छ भूमिका होती. " जोडोनियां धन उत्तम व्यव्हारें । उदास विचारें वेच करी ।। ....” (२८६४) हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. मात्र, उचित नि सन्मानाचा मार्ग सोडून पोट पोसण्यासाठी देव आणि धर्माचा बाजार मांडणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात अत्यंत चीड होती. त्यांनी लिहिले आहे-
कथा करोनियां द्रव्य घेती देती । तयां अधोगति नरकवास ॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ।। (१४७०)
जे कोणी द्रव्यासाठी हरिकथा सांगतात आणि जे तशा लोकांना द्रव्य देतात ते दोघेही नरकात जातील. देवाधर्माच्या नावाने अशी देवघेव करणारी माणसे कुंभीपाक आणि रौरव नावाच्या नरकात वेदना भोगतील. देवालाही त्यांची करुणा येणार नाही. धारदार तलवारीने त्यांच्या अंगांचे तुकडे केले जातील. त्यांना तापलेल्या जमिनीवरून चालवले जाईल. अशा माणसांचा नरकवास कदापि चुकणार नाही. कारण ते यमाच्या हाती लागलेले आहेत.
कथा करोनियां मोल ज्यापें घेती । तेही दोघे जाती नरकामध्यें ||
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ।।
मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ।।
तुका म्हणे करीं ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ।। (१४७८)
कीर्तन, भजन इत्यादींसाठी पैसे घेणारे आणि देणारे दोघेही निःसंशय नरकात जातात. खरे कल्याण केवळ नामभक्तीने होते. त्यासाठी कर्मकांडांची गरज नाही. केवळ नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय इतर शब्दांच्या प्रेमात पडू नका. मग ते कितीही गोड असोत. अन्यथा तुम्ही नरकात जाल. नामभक्तीचा मार्ग स्वीकारा सर्व काही मिळेल. ब्रह्मांडही लहान वाटेल. आयुष्यात कधीच लाचार होऊन कोणापुढे हात पसरू नका. भजन-कीर्तन करून पैसे मागू नका. तसे पैसे मागून भिकाऱ्यांसारखे जीवन जगणाऱ्यांचा धिक्कार असो. तसले लाजिरवाणे जगणे व्यर्थ आहे.
संत असल्याचे ढोंग करणाऱ्यांना, त्यासाठी तशी बाह्य लक्षणे सांभाळणाऱ्यांना नि अंतर्मनात स्वहित जपणाऱ्यांना व पोट पोसण्यासाठी कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे करत फिरणाऱ्या पोटार्थ्यांना संत तुकारामांनी ‘मैंद' (लबाड, लुटारू, विश्वासघातकी) म्हटले आहे. अशा नाटकी लोकांविषयी त्यांनी लिहिले आहे-
टिळा टोपी माळा देवाचें गबाळें । वागवी वोंगळें पोटासाटीं ।।
तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥
कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ।।
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ।। ( ७८८ )
मनात भक्तिभाव नसताना कपाळाला गंध लावणे, डोक्यावर टोपी घालणे आणि गळ्यात माळा घालणे ही संत असल्याची बाह्यलक्षणे मिरवणे म्हणजे वेंधळेपणा होय. पोट भरण्यासाठी केलेला हा घाणेरडा प्रकार होय. तुळशीची पाने कानात घालून मौनव्रताचे नाटक केल्याने, शेंडीत दर्भाची काडी खोवून पुरोहित वा अग्निहोत्री असल्याचे सोंग केल्याने आणि नाक दाबून धरून प्राणायाम केल्याचे ढोंग केल्याने काहीही साध्य होणार नाही. कीर्तन करताना खोटेखोटे भावनिक झाल्याने, लटिकेच रडल्याने आणि मनात प्रेम नसताना डोळ्यात पाणी आल्याचा देखावा केल्याने काहीही साध्य होणार नाही. असा दांभिकपणा करणाऱ्या लुच्चा लोकांजवळ (मइंदाजवळ) देव नसतो.
माणसाने श्रम करून सन्मानाने जगावे ही संत तुकारामांची भूमिका होती. संत असल्याचे ढोंग करणाऱ्यांविषयी आणि पोट पोसण्यासाठी देवाच्या नावाने मनाला येईल ती बडबड करत फिरणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात कमालीची चीड होती. अशा ढोंगी, ऐतखाऊ नि धूर्त लोकांविषयी त्यांनी लिहिले आहे-
न कळे ब्रह्मज्ञान आचार विचार । लटिका व्यवहार करीतसे ॥
विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥
द्रव्यइच्छेसाटी करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ।
पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ।।
तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनियां भंड जनामध्यें ।। ( ३८८८)
ज्यांना कोणतेच ज्ञान नाही आणि उचित- अनुचित कळत नाही, तर केवळ पोट पोसण्यासाठी जे संत असल्याचे ढोंग करतात त्यांचा जन्म म्हैसीपोटी (विश्वामित्री पोटीं) झाला असे समजावे. त्यांना दुर्जन समजावे. जो पैसे मिळवण्यासाठी हरिकथा करतो आणि टाळ कुटीत फिरतो तो महापातकी होय. त्याला चांगल्या मार्गाने श्रम करून जगता येत नाही का? ज्याला काही कळतही नाही आणि ज्याचे आचरण नीट नाही त्याने पोटासाठी कशाला बडबड करत फिरावे? हरिकथेची वल्गना ( भंड) करत फिरणाऱ्याला त्याच्या आईने व्यर्थ जन्म दिला.
पोटासाठी वारकरी संप्रदायाची अप्रतिष्ठा करणाऱ्यांविषयी संत तुकारामांच्या मनात कमालीची चीड दिसते. ती चीड अभिव्यक्त करताना ते लिहितात-
मुखें सांगे ब्रह्मज्ञान । लोकाची कापितो मान ॥
ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ।।
कथा करितो देवाची अंतरीं आशा बहु लोभाची ।।
तुका म्हणे तो चि वेडा । त्याचें हाणूनि थोबाड फोडा ।। (४०२१)
जो लोकांना ज्ञान सांगतो. मात्र, आपण तसे वागत नाही; उलट लोकांना फसवतो. पैशाची हाव धरून भजन, कीर्तन करतो. असे शब्दपांडित्य मिरवणाऱ्याला नालायक समजावे. मूर्ख समजावे. तशा माणसाचे थोबाड फोडावे.
संत तुकारामांनी वारकरी सांप्रदायिकांसाठी आणि सांप्रदायिक कीर्तनकारांसाठी पुढील आचारसंहिता सांगितली आहे. त्यांनी लिहिले आहे-
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥
बुका लावूं नये भाळा | माळ घालूं नये गळां ।।
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ।।
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ।। ( ३०८४)
कीर्तनकाराने कीर्तन केलेल्या ठिकाणचे अन्न खाऊ नये. अर्थात, तिथून काही द्रव्य मिळवण्याची वा अन्न मिळवण्याची आशा कीर्तनकाराला असू नये. कीर्तनकाराचे जगणे विरक्त असावे. कीर्तनकाराने दुसऱ्यांच्या कपाळाला बुका लावून व त्यांच्या गळ्यात माळ घालून इतरांचा गुरू होऊ नये. शिष्यसंप्रदाय तयार करू नये. कीर्तनकारांसोबत जर त्यांचा घोडा, बैल वगैरे असेल, तर त्यांच्यासाठी चारासुद्धा मागू नये. त्याची सोय स्वतःच करावी. तात्पर्य, कीर्तनकाराने निःस्पृह असावे. कीर्तनकाराने कीर्तन केल्याचा मोबदला म्हणून पैसे (द्रव्य) घेऊ नये आणि सांप्रदायिकांनी त्यांना तसा मोबदला (द्रव्य) देऊ नये. अन्यथा तसा मोबदला (द्रव्य) देणारे आणि घेणारे नरकात जातील.
पिंडपोषकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ।।
नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ।।
पोहों नेणे कसे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥
सिणलें तें गेलें सिणलियापासीं । ॐ जाली त्या दोघांसी एक गति ।।
तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ।। (४०६१)
स्वतःचे पोट पोसण्यासाठी जे धार्मिक असल्याचे सोंग करतात, लोकांना परमार्थाच्या गोष्टी सांगतात त्या ढोंगी लोकांच्या ज्ञानाला आग लागो. तसली अनीतिमान माणसे चुकूनही नजरेला न पडोत. जो स्वतः सद्विचारी नि सद्वर्तनी नाही त्याने दुसऱ्याला उपदेश करू नये. जर स्वतःला पोहता न येणारा माणूस दुसऱ्याला पोहायला शिकवत असेल, तर त्या मूर्खाला काय म्हणावे? जर एखादा थकलेला माणूस दुसऱ्या थकलेल्या माणसाकडे गेला, तर त्याचा फायदा काय होणार ? कोणालाही कोणाचा फायदा होणार नाही. उलट दोघांचेही दुःख वाढेल. त्याच न्यायाने अंगी पात्रता नसणाऱ्यांच्या उपदेशाने कोणाचाही फायदा होणार नाही. दीननाथ असणाऱ्या देवा, तसले मूर्ख लोक माझ्या नजरेला पडू नयेत. जे लोक पोट पोसण्यासाठी कीर्तन, भजन, प्रवचन, वारी, दिंडी, यात्रा, सप्ताह वगैरे करत फिरत असतील, लोकांना निरर्थक तत्त्वज्ञान सांगत असतील; पण जर त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कोणतीच संगती नसेल, तर त्यांच्याकडून लोकांना काहीही फायदा होणार नाही. अशा पोटभरू लोकांचे निःसत्त्व ज्ञान म्हणजे स्वप्नातल्या श्रीमंतीसारखे आहे. कागदावर साखर असा शब्द लिहून तो चाटल्याने तो शब्द गोड लागणार नाही. त्याच्याने पोट भरणार नाही. कोणताही फायदा होणार नाही. त्याच न्यायाने पैसे घेऊन कीर्तन करणाऱ्यांना आणि तशा कीर्तनकारांना पैसे देणाऱ्यांना कोणताच पारमार्थिक लाभ होणार नाही. पैसे देणाऱ्यांच्या प्रपंचाचे मात्र वाटोळे होईल. मुळात हा सगळा व्यवहारच तत्त्वशून्यतेचा होय. तिरस्करणीय होय. असा व्यवहार करणारी माणसे नादान आणि कर्तृत्वशून्य असतात. ढोंगी आणि नालायक असतात, ही संत तुकारामांची भूमिका होती. तसे लोक नक्कीच नरकात जातील, हेही त्यांनी नोंदवले आहे. त्यांनी लिहिले आहे-
स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठी नाहीं ।
तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकों नये ।।
बोलाचीच कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ।।
कागदी लिहिली नांवाची साकर । चाटितां मधुर केवीं लागे ।।
तुका म्हणे जळो जळो त्याचें ज्ञान । यमपुरी कोण दंड साहे ।। (४३९३)
स्वप्नात जरी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आणि व्याजाच्या रुपयांची व्यवस्थित नोंद (काळांतर लेखा) करून ठेवली, तरी प्रत्यक्ष जाग आल्यावर त्यातला एक पैसाही मिळत नाही. त्याच न्यायाने पोट पोसण्यासाठी शब्दज्ञानाच्या केलेल्या कोरड्या बडबडीने काहीही साध्य होणार नाही. तेव्हा तसले अनुचित काम करू नये. पोट भरण्यासाठी पारमार्थिक होऊ नये नि लोकांना देवाधर्माचे पोकळ ज्ञान सांगत फिरू नये. बोलाचा भात व बोलाचीच कढी खाऊन कोणाचे पोट भरत नसते किंवा कागदावर लिहिलेला 'साखर' शब्द चाटल्याने तो शब्द गोड लागत नसतो. तसेच जी बाब आपण लोकांना सांगतो ती बाब जर आपल्या अनुभवाचा भाग नसेल आणि आपल्या व्यवहाराचा भाग होत नसेल, तर ते सगळे सांगणे व ऐकणेही व्यर्थ आहे. अशी व्यर्थ बडबड करत फिरणाऱ्याचे ते ज्ञान जळून जावो. त्यांच्या नादी लागू नका. अन्यथा तुम्हालाही यमपुरीच्या वेदना भोगाव्या लागतील.
कीर्तन, भजन, प्रवचन इत्यादींसाठी पैसे घेणारे लोक आणि तशा आपमतलबी लोकांना पैसे देणारे लोक यांच्याविषयी संत तुकारामांच्या मनात कमालीची चीड होती. देवाधर्माचा बाजार मांडून पोट पोसू नये आणि लोकांनी देवाधर्माचा बाजार मांडणाऱ्यांना साह्य करू नये, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यांनी असेही म्हटले आहे की, कीर्तन करण्यासाठी पैसे घेणे म्हणजे मातृगमनाइतके वाईट आहे, कीर्तनासाठी पैसे घेणे म्हणजे स्वतःच्या आईला वेश्या व्यवसाय करायला लावून त्याचे पैसे (भाड) घेण्याइतके वाईट होय. 'विठ्ठलाचे गुणकीर्तन' ही बाब वारकऱ्यांसाठी आईपेक्षाही थोर आहे. मग पोट भरण्यासाठी कीर्तन करणे याच्याइतके वाईट काय असू शकते ? पोटासाठी स्वतःच्या आईलाच विकणार का ? हा त्यांचा रास्त प्रश्न आहे. वाईटातला वाईट माणूसही पोट पोसण्यासाठी आईची भाड खात नाही, मग जर वारकरी आपल्या आईला (हरिगुणकीर्तनाला) विकत असतील, तर त्याच्याइतके लाजिरवाणे दुसरे काय असणार? संत तुकारामांनी म्हटले आहे की, पैसे घेऊन कीर्तन करणारे लोक आणि तशा कीर्तनकाराला पैसे देणारे लोक नक्कीच नरकात जातील. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अशा पापांमुळे त्यांचे पूर्वजही नरकात जातील. तशा माणसांचे तोंडही पाहू नये. कारण त्यांचे तोंड पाहणाऱ्यांचेही पूर्वज नरकात जातील. त्यांनी लिहिले आहे -
कीर्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाई धन विटाळ तो ।।
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ति । एक इजवर पोट भरती चांडाळ ते ।
अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाईना जननीची ॥
तुका म्हणे त्याचें दर्शन ही खोटें । कापूर्वासि नेटें नरका धाडी ।। (४४१०)
संत तुकारामांची भूमिका रास्त आहे. ते म्हणतात- (माणसाने देवाधर्माला विकून लाचारीचे व तत्त्वशून्य जीवन जगू नये, तर कष्ट करून सन्मानाचे जीवन जगावे.
वारकरी सांप्रदायिकांनी आपले दैवत असलेल्या विठ्ठलाला विकायला काढू नये, वारकऱ्यांनी वारकरी संप्रदाय बदनाम करू नये आणि सांप्रदायिक तत्त्वज्ञानाला काळिमा फासू नये, ही त्यांची अंतःकरणापासूनची तळमळ होती. त्या तळमळीपोटीच पुनःपुन्हा सांगत राहिले की - 'बाबारे! पोटासाठी आपल्या दैवताला विकू नका, संप्रदायाची बदनामी करू नका, सांप्रदायिक तत्त्वज्ञानाचे सत्त्व जपा व ते तत्त्वज्ञान आचरणात आणा.
संत तुकारामांनी लोकांचे हृदयपरिवर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. वस्तुस्थिती हीच आहे की, सांप्रदायिकांनी संत तुकारामांचे म्हणणे फार काही मनावर घेतले नाही. उलट निर्लज्जपणे संत तुकारामांचे सोयीचे अभंग आधाराला घेऊन कीर्तन करत राहिले. विठ्ठलाला विकत राहिले. विठ्ठलभक्तीचा बाजार मांडत आले. मांडत आहेत. कीर्तन, भजन, प्रवचन वगैरेंसाठी पैसे घेणाऱ्या आणि पैसे देणाऱ्या लोकांना जर कोणी संत तुकारामांच्या उपरोक्त अभंगांची आठवण करून दिली आणि त्यांना परमार्थ मार्गात अशी पैशांची देवघेव उचित ठरत नाही; तेव्हा तुम्ही पैसे घेऊ नका नि वारकरी संतांनी लिहिलेले अभंग, वारकऱ्यांचे दैवत असणारा विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांची विक्री करू नका असे सांगितले, तर त्यांचे उलट उत्तर तयारच असते. ते उत्तर पुढील दोन पद्धतीचे असते. १) ते लोक संत तुकारामांच्या अभंगांचा इतरांनी लावलेला अर्थ नाकारतात आणि त्यांच्या सोयीचा अर्थ लावतात. त्यांनी त्यांच्या सोयीने लावलेला अर्थ इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आत्मा, परमात्मा, ब्रह्मज्ञान, परब्रह्म इत्यादी शब्दांचा भडिमार करतात. थोडक्यात म्हणजे शब्दच्छल करतात. इतरांना गोंधळून टाकतात. आणि (२) जर शब्दच्छलाने काम जमले नाही, तर स्वतःच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित करतात. जर आम्ही पैसे घेतले नाहीत, तर मग आम्ही जगायचे कसे ? आमच्या लेकरांना पोसायचे कसे? असे त्यांचे प्रश्न असतात.
संत नामदेवांपासून ते संत तुकारामांपर्यंत सगळ्या संतांनी पोट पोसण्यासाठी कीर्तन, भजन, प्रवचन, वारी, दिंडी, यात्रा, सप्ताह वगैरे करत फिरणाऱ्या लोकांवर आणि आपमतलबासाठी देवाधर्माचा बाजार मांडणाऱ्या दुष्प्रवृत्तींवर प्रहार केले आहेत. याचा सरळ अर्थ असा की, त्या काळातही ही प्रवृत्ती होतीच. स्वहितासाठी देवाधर्माला विकणारे लोक तेव्हाही होतेच. त्या काळातही कीर्तनकार पैसे घेत होते. जर तसे नसते, तर संतांनी तशा लोकांवर टीका केली नसती. दुसरे म्हणजे परमार्थमार्गात पैशाची देवघेव करणारे लोक आज जसे स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करतात, शब्दच्छल करतात वा नको ते प्रश्न उपस्थित करतात तसेच त्या काळातल्या लोकांनीही केले असेल. थेट संत तुकारामांनाही प्रश्न विचारले असतील आणि मग संत तुकारामांनीही त्यांना थेटपणे उत्तरे दिली असतील.
प्रापंचिक माणसाला त्याच्या कुटुंबाचे पोषण करावे लागते नि त्यासाठी द्रव्य लागते याची जाणीव संतांना होतीच. तुम्ही प्रपंच सोडून परमार्थाच्या मागे लागा, भजन, कीर्तन वगैरे करत फिरा असा संतांचा कोणालाही आग्रह नव्हता. उलट संतांनी लोकांना, तुम्ही तुमचा संसार नीट करा, प्रामाणिक व्यवहार करून आपले कुटुंब नीट पोसा, एकमेकांना समजून घेत व साह्य करत बंधुभावाने जगा, जेथे आहात तेथे व जसे आहात त्या स्थितीत केवळ नामस्मरण करा, तोच खरा परमार्थ आहे... असे ठणकावून सांगितले. त्याची सविस्तर चर्चा मागे आली आहेच.
संत तुकारामांनी सांगितले की, 'बाबारे! प्रपंच सोडून परमार्थ करण्याची गरज नाही. माणुसकी जपत प्रामाणिकपणे नीट संसार करण्यातूनच पुण्य मिळवता येते. तसा संसार करणे म्हणजेही एक प्रकारचा परमार्थच होय. संसार करणाऱ्यांनी संतांसारखा वेगळा परमार्थ करण्याचा मार्ग स्वीकारू नये. तशी तुमच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाही वा जबाबदारी टाकलेली नाही आणि तुम्ही या मार्गात आला नाहीत म्हणून काही कोणाचे नुकसानही होणार नाही. सामान्य लोकांना संतांसारखे अनासक्त वृत्तीने परमार्थ करणे जमणार नाही. तेव्हा त्यांनी उगीच पारमार्थिक असल्याचे भक्ती ही सुळावरल्या पोळीसारखी कठीण गोष्ट आहे. जो कोणी या मार्गाची निवड करतो नि विहित मार्गाचे अनुसरण करतो त्याला अपवादात्मक शूर म्हणायला हवे. पाहावे तेथे केवळ भक्तीचे ढोंग दिसत आहे. खरी भक्ती दिसत नाही. हा सगळा प्रकार म्हणजे पाया मजबूत नसणाऱ्या भिंतीसारखा आहे. तकलादू आहे. जर मनातून आणि नीट स्वयंपाक केला (कामावले), तर त्याला रुची असते. अन्यथा ते अन्न चवहीन होते. उगीच नको ते साहित्य नको त्यात मिसळले, तर सगळेच बिघडते. त्या तशा अन्नाला कितीही चवदार म्हटले तरीही ते मुळात चवहीनच असते. ते अन्न खाण्याच्या लायकीचेही नसते. वरवरच्या भक्तीचेही तसेच असते. जर तुमचे तुमच्या विकारांवर नियंत्रण असेल आणि तुम्ही नेहमी सावध असाल, तरच पारमार्थिक व्हा. जर हे शक्य नसेल, तर मग संसार नीट करा. परमार्थाच्या मागे लागू नका.
जुझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ।।
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ।।
ढोंग करून हा मार्ग कलंकित करू नये. निर्विकारपिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वृत्तीने परमार्थ करणे, म्हणजे सुळावरची पोळी होय. तेव्हा याच्या नादाला लागू नये.
जे लोक कमालीच्या निर्लज्जपणे असे म्हणतात की, 'जर आम्ही पैसे घेतले नाहीत, तर मग आम्ही आमच्या लेकरांना काय खाऊ घालायचे?' त्यांनी संत तुकारामांचे पुढील अभंग नीट समजून घ्यायला हवेत. संत तुकारामांनी म्हटले आहे-
भक्ति तों कठिण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर |
जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ।।
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ।
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ।। (१५४१)
तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ।। (३८७४)
युद्धाच्या गोष्टी ऐकायला छान असतात, प्रत्यक्ष युद्ध करणे सोपे नसते. हरिभक्तीचेही तसेच आहे. पारमार्थिक असणे हे जिकिरीचे काम आहे. जीव धोक्यात घालून करावयाचे काम आहे (सुळावरची पोळी आहे. ) तेव्हा एकमेकांचे ऐकून परमार्थाच्या नादी लागू नका. पोट पोसण्यासाठी पारमार्थिक होणे म्हणजे इंद्रियांच्या अंकित असणे होय. असल्या लटक्या भक्तीने कोणाचेही काहीही भले होणार नाही. '
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे 1
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ।। 55
विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ।
तुका म्हणे करुनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ।। (७११)
परमार्थाच्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत; परंतु तसे अनासक्त वागणे अवघड आहे. वैराग्य ही सहजसाध्य बाब नाही. त्यासाठी जीव संकटात घालावा लागतो. लोक 'मी संन्यस्त वृत्तीने जगतो' असे म्हणतात, पण ते काही खरे वाटत नाही. सर्वसंगपरित्याग करून निरिच्छ वृत्तीने जगणे म्हणजे प्रत्येक घासाला विष खाण्याइतके अवघड आहे. ज्याने तसे वागणे आत्मसात केले आहे त्याला धन्यच म्हटले पाहिजे. जो ‘मी संन्यस्त वृत्तीने जगतो' असे म्हणतो, तो जर खरेच तसे जगत असेल, तर मी त्याचे पाय माझ्या अंतःकरणात जपेन.' अर्थात, परमार्थ ही सहजसाध्य होणारी गोष्ट नाही. तेव्हा उठसूट कोणीही परमार्थाच्या फंदात पडू नये. ज्यांना शक्य आहे आणि ज्यांच्या अंतर्यामी वैराग्यभाव आहे त्यांनीच परमार्थमार्गात यावे. अशीच सच्ची माणसे या मार्गाचे पावित्र्य टिकवून ठेवू शकतील. सांप्रदायिक तत्त्वज्ञानाचे सत्त्व जपतील आणि अशीच माणसे जनसामान्यांना जीवनाचा योग्य मार्ग दाखवतील, यावर संतांचा विश्वास होता.
अशी माणसे फार असणार नाहीत, याचेही त्यांना भान होते. पण ती अपवादात्मक माणसेच वारकरी संप्रदायाचे महत्त्व टिकवतील, तशा माणसांमुळेच संप्रदायाला नैतिक अधिष्ठानाचे बळ मिळत राहील, ही त्यांची रास्त भूमिका होती. विशेष म्हणजे अशा अपवादात्मक माणसांनीच वारकरी संप्रदायाचे सत्त्व जपले आहे. संत गाडगेबाबा हे त्याचे अलीकडचे उत्तम उदाहरण होय. परमार्थमार्गात खूप लोक जमवून परमार्थाचा बाजार भरवायचा नसतो याची संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत कबीर, संत रोहिदास, संत तुकाराम इत्यादींना जाणीव होती. म्हणून ते सांसारिकांना 'तुम्ही तुमचा संसार नीट करा. परमार्थाच्या फंदात पडू नका.' असा थेट
सल्ला देत होते.
वारकरी संप्रदायाने सांसारिकांसाठी सांगितलेला भक्तिमार्ग सोपा आहे. त्यांनी केवळ 'विठ्ठल - विठ्ठल' किंवा ‘रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा' या नामाचा जप करावयाचा आहे. मात्र, ज्यांना विरक्त पारमार्थिक व्हायचे आहे त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नाही. जर या मार्गात आलात, तर तुम्ही संसाराला मुकाल, असे संतांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. अर्थात, प्रापंचिकांनी आपला प्रपंच करताना केवळ नामभक्ती करावी, 'विठ्ठल - विठ्ठल' किंवा 'रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा' या नामाचा जप करावा. त्यासाठी जात, धर्म, पंथ, वय, सोवळे-ओवळे असे कोणतेही बंधन नाही. व्यवहारांत माणुसकीचा धर्म पाळावा, समूहभाव जपत समूहजीवन जगावे, ही त्यांची भूमिका आहे. संत तुकारामांनी लिहिले आहे-
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥
भक्तीची ते जाती ऐसी सर्वस्वासी मुकावें ।।
भिक्षा आणि वेवसाव काला करितो गाढव ।।
करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥
प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ।
तुका म्हणे होंई शूर । किंवा निसुर मजुर ।। (९०२)
भक्ती ही सहजसाध्य बाब नाही. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. विरक्त पारमार्थिक होण्यासाठी संसार सोडावा लागतो. ज्यांना असे करणे शक्य नाही, ज्यांचे मन संसारात गुंतले आहे आणि ज्यांना संसार सोडवत नाही त्यांनी या मार्गाच्या फंदात पडू नये. भिक्षा आणि व्यवसाय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या एक समजू नयेत. भीक मागणाऱ्यांनी 'मी भीक मागण्याचा व्यवसाय करत आहे.' असा समज करून घेऊ नये. त्याच न्यायाने विरक्त असणे आणि सांसारिक असणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या एक समजू नयेत. जो तसे समजतो तो मूर्ख (गाढव ) होय. स्वार्थासाठी कीर्तन, भजन, प्रवचन करत फिरणाऱ्यांनी निःस्वार्थीपणाचे ढोंग करू नये. दुसऱ्यांचे काव्य चोरून आपल्या रचनेत मिसळणे आणि आपली रचना सुंदर (प्रासादिक) असल्याचा भ्रम निर्माण करणे म्हणजे तुपामध्ये पाणी मिसळण्यासारखे होय. मूर्खपणा होय. त्याच न्यायाने ढोंगी साधूने खऱ्या सात्त्विक हरिदासाचे ढोंग करणेही गाढवपणाचेच लक्षण होय. एक तर तुम्ही शूर सिद्धपुरुष (पारमार्थिक) व्हा किंवा मजूर (सांसारिक) व्हा. तात्पर्य हे की, सांसारिकांनी पारमार्थिक असल्याचे नाटक करू नये. आपला संसार नीट करावा.'
येणें मार्गों आले । त्यांचें निसंतान केलें ॥
ऐसी अवघड वाट । ऐकोन आलों मी बोभाट
नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥
तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ।। (२७८२)
जे विरक्त होऊन परमार्थ मार्गात येतात ते संसारापासून तुटतात. त्यांचा वंश पुढे वाढत नाही. अर्थात, ही वाट अतिशय अवघड आहे. जे या वाटेवरून चालत आहेत त्यांचा आक्रोश (बोभाट ) मला माहीत आहे. तेव्हा विचार करूनच या फंदात पडा. पुन्हा दुःख उगाळत बसू नका. इथली नागवण अशी आहे की, लंगोटीही शिल्लक राहत नाही. तो
पंढरपूरचा विठ्ठल पुन्हा तुम्हाला मागे फिरू देणार नाही. अर्थात, परमार्थात सर्वस्वाचा त्याग अपेक्षित आहे.
सदासर्वकाळ अंतरी कुटिल तेणें गळां माळ घालूं नये ।।
तुका म्हणे ज्यासी नाहीं हरिभक्ति । तेणें भगवें हातीं धरूं नये ।। (२७८९)
मनातून कपटी असणाऱ्या माणसाने माळकरी होऊ नये. ज्यांच्या अंगी दया, क्षमा, शांती हे गुण नाहीत आणि जो माणुसकीचा धर्म पाळत नाही त्यांनी अंगाला विभूती लावू नये. ज्याला भक्ती म्हणजे काय? हे माहीत नाही त्यांनी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करू नयेत. ज्याचे स्वतःच्या मनावर व इंद्रियांवर नियंत्रण नाही त्यांनी संसार सोडून साधू होण्याचे सोंग करू नये. ज्याला हरिभक्तीचे मर्म कळाले नाही त्यांनी हाती भगव्या पताका घेऊन दिंडीत सामील होऊ नये. वारकरी असल्याचे ढोंग करू नये.
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचें काम नाहीं येथें ॥
बहु धड जरी जाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ।।
तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येईल कळों ।। (१२०४)
संत असणे ही बाब वेगळी आणि वंदनीय आहे. केवळ शब्दांचे खेळ करून कीर्तन केल्याने कोणी संत होत नाही. एखादी म्हैस किंवा गाय खूप दूध देते म्हणून त्या म्हशीला वा गायीला कामधेनू म्हणता येणार नाही. तसेच केवळ चांगला कीर्तनकार म्हणजे चांगला संत असे नसते. संत होण्यासाठी संतत्व अंगी रुजवावे लागते. संतांसारखे आचरण असावे लागते.
आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हां चि गोसावी व्हावें तेणें ।।
नाहीं तरि सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ।।
आशा मारूनियां जयवंत व्हावें । ज्यासी नाहीं धर्म दया क्षमा शांति ।
तेव्हां चि निघावें सर्वांतूनि ।। तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥
तुका म्हणे जरीं योगाची तांतडी
वारकरी जयासी न कळे भक्तीचें महिमान । आशेची बीबुडी करीं आधीं ।। (१४३६)
तेणें ब्रह्मज्ञान बोलों नये ।।
ज्याचें मन नाहीं लागलें हातास ।
जर संत व्हायचे असेल, तर प्रथम आशा व स्वार्थाचा पूर्णतः त्याग करावा लागतो. ज्याला हे जमले आहे तोच संत असतो. केवळ त्यांनी लोकांना परमार्थाच्या गोष्टी सांगाव्यात. बाकीच्यांनी संत असल्याचे ढोंग करण्यापेक्षा नीट आपला संसार सांभाळावा. श्रम करून बायको व लेकरांना पोसावे. दुसऱ्यांना फसवू नये आणि संसारात स्वतःची फजिती करून घेऊ नये. मनातील इच्छा, वासना, लोभ वगैरेंवर नियंत्रण ठेवणे ज्यांना जमले आहे, ते विजयी (जयवंत ) होत. अशा लोकांनीच सर्वसंगपरित्याग करून घराबाहेर पडावे. ज्याला संत व्हायचे आहे त्यांनी प्रथम इच्छा, वासना, लोभ इत्यादींचा बीमोड (बीबुडी) केलाच पाहिजे. ज्यांना हे जमत नाही त्यांनी संसार सोडू नये नि संत असल्याचे ढोंग करू नये.
अनेक ढोंगी कीर्तनकार संत तुकारामांच्या पुढील अभंगाचे दाखले देत असतात
मुंगी आणि राव । आम्हां सारखाची जीव ।।
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ।।
सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तीं ॥
तुका म्हणे आलें ।
थोडक्यात म्हणजे संत नामदेव, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत कबीर, संत तुकारामादी सगळे संत मुळात प्रापंचिक होते. त्यांनी लोकांना संसार करताना आचरणात आणता येईल असा एक नामभक्तीचा सोपा मार्ग सांगितला. प्रपंच करतानाच नामभक्ती करावी, ही त्यांची भूमिका होती. महत्त्वाचे म्हणजे संतांनी स्वतःच्या संसाराचा त्याग केला नाही. त्यांनी संसार करतानाच संप्रदायाची उभारणी केली, सांप्रदायिक तत्त्वज्ञानाची मांडणी केली, संप्रदायाचा प्रसार केला, प्रचार केला. लोकांना कर्मकांडरूप वैदिक धर्माच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला.
हे असे करण्यापाठीमागे संतांची भूमिका लोकांना परमार्थमार्गात गोवण्याची नव्हती, तर लोकांना फसव्या परमार्थमार्गातून सोडवण्याची होती. पारलौकिक सुखाच्या भ्रमातून मुक्त करण्याची होती. लोकांना आत्मभान यावे, त्यांना आत्महिताची व आत्मसन्मानाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रपंच नीट करावा व लौकिक जीवन नीट जगावे, ही त्यांची अंतर्मनाची तळमळ होती. त्यासाठीच त्यांनी दैनंदिन कामकाज करताना नामस्मरण करावे आणि आचरण चांगले ठेवावे हा हितोपदेश केला, ही बाब खूप महत्त्वाची आहे.
वारकरी संप्रदायाचे मूळ मर्म सर्वसामान्य समाजाच्या लक्षात आले नाही. दुसरे म्हणजे काही आपमतलबी लोकांनी या संप्रदायाचा गैरफायदा घेतला. स्वतः चे पोट पोसण्यासाठी सांप्रदायिक विचारांची सोयीने मांडणी केली. पंढरपूरच्या बडव्यांनी विठ्ठलाला घेरले. विठ्ठलाचा ताबा मिळवला. त्यांनी तिथे दुकानदारी सुरू केली. श्रमिकांनी निर्माण केलेला देव श्रमिकांनाच विकण्याचे कृष्णकृत्य सुरू केले. विठ्ठलाच्या नावाने दक्षिणा घेऊन ते मस्तीत जगले. बडव्यांनी विवेक, माणुसकी आणि आत्मसन्मान यांपासून फारकत घेतली.
घरा वैकुंठ सगळें ।। (१८९५)
ढोंगी कीर्तनकार लोकांना सांगत असतात की ‘माणसाने सोनेही मातीसारखे समजावे. धनावर आशा ठेवू नये. लोभी असू नये. दानधर्म करावा.' लोकांना असे सांगणारे हे पाखंडी लोक स्वतः मात्र धनाचे लोभी असतात. कीर्तन केल्याचा मोबदला घेतात. जास्तीचे पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करतात. विशेष म्हणजे हे लोक स्वतः कधीच दानधर्म करत नसतात. अर्थात, दांभिक कीर्तनकारांनी आणि त्या दांभिक कीर्तनकारांच्या ढोंगाला भुलून त्यांना महाराज समजणाऱ्या भोळ्याभाबड्या लोकांनी संत तुकारामांचे वरील अभंग नीट समजून घ्यावेत. ढोंगी महाराजाची सेवा करू नये, त्यांचे कीर्तन ऐकू नये आणि तशा ढोंग्यांना पैसे देऊ नये. आपण सद्धर्म करत आहोत तेव्हा आपणास सद्गती मिळेल या भ्रमात राहून अधर्म करू नये नि आपल्या अधःपतनाला आपणच तथाकथित महाराजांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, भजनकऱ्यांनी खेड्यापाड्यांतल्या
गोरगरिबांना लुबाडले. या ढोंगी लोकांचे ऐकून परमार्थाच्या नादी लागलेल्या भोळ्याभाबड्या समाजाचे लौकिक जगणे नासले आणि नैतिक अध:पतन झाले. भोळेभाबडे लोक अर्धपोटी आणि अर्धनग्न अवस्थेत जगत राहिले. स्वतःला कीर्तनकार, महाराज, प्रवचनकार, भजनकरी, टाळकरी म्हणवून घेणारे दांभिक लोक गोरगरिबांच्या श्रमांवर जगत आले. फुकटचे खात राहिले. खात आहेत. मुळात संतांनी भोळ्याभाबड्या लोकांच्या मुक्तीसाठीच या संप्रदायाची उभारणी केली होती. मात्र, या संप्रदायाची सूत्रे लोकांच्या हाती गेली आणि पुन्हा एक शोषणाचे नवे षड्यंत्र आकाराला आले. आपमतलबी कुटिल लोकांनी वारकरी संप्रदायाच्या आधाराने शोषणाचा नवा मार्ग निर्माण केला. विठ्ठलाच्या नावाने श्रद्धेचा बाजार भरवला. भोळ्याभाबड्या माणसांचे शोषण केले. त्यांच्या श्रद्धाभावाचा गैरफायदा घेतला.
जे ब्राह्मणी व्यवस्थेचे लाभधारक होते ते सामान्यतः जन्मजातीने ब्राह्मण होते. वर्णव्यवस्थेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या लोकांनी ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थन केले. कारण त्या व्यवस्थेत त्यांचे हित दडले होते. मात्र, खरी अधिसत्ता होती ती ब्राह्मणांच्या हाती. आपल्या अस्तित्वाला नि हिताला धक्का लागू नये म्हणून त्यांनी 'ब्राह्मणी व्यवस्था' जपण्याचा अतीव प्रयत्न केला. प्रसंगी ब्राह्मणांनी जन्मजातीने ब्राह्मण असणाऱ्या ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले. इतर संतांचा कमालीचा छळ केला. आणि वारकरी संप्रदाय 'हायजॅक' केला. जन्मजातीने ब्राह्मण असलेल्या संधिसाधू कीर्तनकारांनी व प्रवचनकारांनी संतांच्या समाजहितकारक विचारांना अनपेक्षित दिशा दिली.
बहुजन जातींतील संतांनी निर्माण केलेल्या या संप्रदायात स्वहिताची चांगली संधी आहे, हे लक्षात येताच जन्मजातीने बाह्मण असलेले अनेक जण वारकरी सांप्रदायिक झाले. कीर्तनकार व प्रवचनकार झाले. नव्याने त्यांनी त्यांची दुकानदारी सुरू केली. भोळाभाबडा समाज त्यांच्या डावपेचांचा बळी ठरला.
दुसरे म्हणजे खेड्यापाड्यांतून अन्य विविध जातींतील ढोंगी संत आणि भजनकरी निर्माण झाले. त्यांनीही स्वतःच्या पोटाची सोय लागावी म्हणून बहुजनांतील भोळ्याभाबड्या लोकांना लुबाडले. लोकांना निःस्वार्थतेचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला. लोकांना दानाचे व दक्षिणेचे महत्त्व सागून त्यांनी लोकांकडून दान आणि दक्षिणा उकळली. या पोटार्थी लोकांनी वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठलाचा बाजार मांडला आहे. हे सगळे पूर्वीपासूनच होत आले आहे. त्या- त्या काळातल्या संतांनी या स्वार्थमूलक अनुचित प्रवृत्तींवर टीका केली आहे. आजही अनेक जण वारकरी असल्याचे ढोंग करत ऐतखाऊ जीवन जगत आहेत. हे सत्त्व गमावलेले व तत्त्वशून्य जीवन जगणारे लोक या संप्रदायाला बदनाम करत आहेत. संतांचेच अभंग आधाराला घेऊन कीर्तन करत आहेत, संतांनी सांगितलेला विचार आपल्या सोयीने लोकांना सांगत आहेत आणि आपला मतलब साधत. आता समाजाने सावध होणे, विवेकी होणे आणि संतांचे मूळ विचार काय आहेत ते नीट समजून घेणे व या संप्रदायाचे सत्त्व जपणे आवश्यक आहे.
थोडक्यात म्हणजे, वारकरी संप्रदायाची उभारणी जन्मजातीने ब्राह्मण असणाऱ्यांनी केली नाही, तर बहुजन जातींतील संतांनी केली आहे. ब्राह्मणी व्यवस्थेच्या कचाट्यातून भोळ्याभाबड्या लोकांना सोडवणे हे संतांनी त्यांचे जीवनध्येय मानले होते. त्यासाठी त्यांनी हयातभर प्रयत्न केले. मात्र, झाले ते उलटेच. जे लोक जन्मजातीने ब्राह्मण होते आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे कट्टर विरोधक होते, त्यांनी या संप्रदायावर ताबा मिळवला. ब्राह्मणांनी स्वार्थासाठी स्वतःच्या मूळ भूमिकेला तिलांजली दिली
मराठी संशोधन पत्रिका / जाने.- फेब्रु.- मार्च २०२४
page ९६ to १०७