पुस्तकः वाया गेलेले पोर
लेखकः डॉ. विजय शिरीशकर
संतांचा सहवास
चाळीस चौरस फूट जागेत राहणाऱ्या अतिसामान्य कुटुंबात वाढलेला मी. राहत्या जागेत हातभट्टीचा गुत्ता आणि मटक्याचा धंदा. आजूबाजूला जुगाराचे अड्डे, मारामाऱ्या, गुंडागर्दी व गँगवॉर हे नेहमीचेच, अशा वातावरणात मी वाढलो; अशा मुलाचा पुढे अनेक उच्चशिक्षित गुरुजनांशी संबंध आला, वैद्यकीय क्षेत्रातील देश-विदेशातील नावाजलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधता आला. त्यावर कळस म्हणजे या मुलास देश-विदेशात मान्यता पावलेल्या संतांना भेटण्याची संधी मिळाली. हे सर्व अविश्वसनीय वास्तव माझ्याबाबतीत घडले होते.
मला पहिला सहवास मिळाला तो मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि स्वाध्याय परिवाराचे सर्वेसर्वा पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचा. त्यांच्याशी माझी पहिली भेट मी दापोली येथील रमाबाई आंबेडकर वसतिगृहात दहावीत शिकत असताना झाली. पूज्य दादा त्यावेळी आमच्या बोर्डिंगशेजारीच राहत असलेल्या बाबा फाटकांना भेटायला आले होते.
बाबा फाटक गांधीजींचे निस्सिम भक्त आणि समाजसेवक होते. ते शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे. ते शेती करत. रोज सकाळी ते दापोलीतील टोपलीचे संडास असलेल्या ठिकाणांहून स्वतः मैला गोळा करून आणत आणि त्याचे सोनखत तयार करत. दादांना कळले की शेजारीच मागासवर्गीय मुलांचे मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृह आहे. ते आम्हा मुलांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी वसतिगृहात आले. त्यांनी आम्हाला एकत्र बसवून आमच्याशी संवाद साधला आणि साने गुरुजींची लोकप्रिय प्रार्थना आमच्याकडून म्हणून घेतली-
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे । जगी जे हीन अति पतित,
जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।१।।
सदा जे आर्त अती विकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।२।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे ।।३।।
प्रभुची लेकरे सारी, तयांना सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ।।४।।
असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ।।५।।
दादांच्या भेटीने आम्ही सर्व मुले भारावून गेलो होतो. या भेटीच्या वेळी दादांनी त्यावेळी वसतिगृहात अकरावीत शिकत असलेल्या बौद्धाच्या खैरे नावाच्या मुलाला पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतले. अकरावीनंतर हा मुलगा दादांच्या गिरगावच्या पाठशाळेत पुढील शिक्षणासाठी राहिला.
पूज्य दादांशी माझी दुसरी भेट मी एम.डी. झाल्यानंतर वसईत स्थायिक, स्थिरस्थावर झाल्यानंतर झाली. मी काही काळ वसईतील आमच्या डॉक्टरांच्या स्वाध्याय परिवारात सहभागी झालो होतो. आमच्या परिवारात डॉ. मेहता, डॉ. पाकणीकर, डॉ. कणेकर, डॉ. काळे, डॉ. बिजूर अशी मंडळी होती. दमणला भक्तीफेरीचा एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्यात प्रभातफेरी, प्रवचन आणि स्थानिक स्वाध्यायींच्या तेथील कार्याची आणि त्यांनी केलेल्या प्रगतीची आम्ही माहिती करून घेतली. मी आणि शैलजा दोघेही सहभागी झालो होतो. त्यानंतर पूज्य दादांनी आम्हा वसईतील सर्व डॉक्टर्स स्वाध्यायींना गिरगावातील त्यांच्या पाठशाळेत आमंत्रित केले होते. आम्हा दहा-बारा जणांना त्यांच्यासमोर बसून त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य लाभले. तो दिवस मी कधी विसरणार नाही. तसेच दादांच्या ठाण्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठातील कार्यशाळेत आम्ही सर्व स्वाध्यायी डॉक्टर्स गेलो असता तेथे दादांच्या सुपुत्रींनी दीदींनी आम्हाला मार्गदर्शन केले होते.
माझी दादांशी तिसरी भेट ९ फेब्रुवारी १९८६ रोजी झाली. त्यावेळी वसईत व्हॅटिकनचे पोप द्वितीय जॉन पॉल यांचे आगमन होणार होते. सेंट ऑगस्टीन शाळेच्या मैदानावर 'सर्वधर्मसमभाव'चा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पूज्य दादांना आमंत्रित केले होते. माझे आणि माझ्या घराचे सौभाग्य की पूज्य दादा संध्याकाळच्या पोपमहोदयांसोबतच्या कार्यक्रमापूर्वी दुपारी आमच्या घरी विश्रांतीसाठी थांबणार होते. पूज्य दादांच्या आगमनाप्रीत्यर्थ माझ्या वास्तूला स्वाध्यायींनी फुलांनी सजविले होते. मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. इमारतीत दादांच्या दर्शनासाठी वसईतील स्वाध्यायींची रीघ लागली होती. आमच्या वास्तूला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले होते. दादांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. चहापानानंतर त्यांनी आमच्या शयनकक्षात तासभर विश्रांती घेतली. आम्हा कुटुंबीयांना त्यांची थोडीफार का होईना सेवा करण्याची संधी मिळाली. आम्हाला त्यांचे सान्निध्य लाभले हे आमचे परम भाग्य.
संत मदर तेरेसा त्यांच्या रुग्णसेवेकरिता आणि मानवतेच्या कार्याकरिता जगभर प्रसिद्ध आहेत. त्या वसईतील प्रसिद्ध कार्डिनल ग्रेशस ट्रस्टच्या हॉस्पिटलला भेट देणार होत्या. मी त्या हॉस्पिटलमध्ये अगदी सुरुवातीपासून ऑनररी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो. आम्हा सर्व डॉक्टर्सना, सिस्टर्सना आणि सर्व स्टाफला मदरना भेटण्याची संधी मिळाली. मी शैलजासह त्यांना भेटलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. एक-दोन मिनिटे त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्यासोबत छायाचित्र घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
वसईतील माझे आणखी एक आध्यात्मिक गुरू दयानंद बाबा. दयानंद बाबा म्हणजे दया आणि आनंद यांचा संगम. वय साधारण ३५-३६ वर्षे असेल. बाबा उंचेपुरे, गोरेपान. अध्यात्मामुळे त्यांच्या चेहऱ्यावर असलेले दैवी बलय सतत जाणवायचे. त्यांचा सर्व जातीधर्माच्या लोकांचा मोठा भक्तपरिवार होता. त्यात अनुसूचित जातीपासून जैन धर्माचे लोकदेखील होते. ते कुटुंबासह बाबांकडे यायचे. सर्व जण बाबांकडे फक्त अध्यात्मासाठी नव्हे तर सर्व प्रकारच्या शारीरिक व्याधी, व्यावसायिक आणि कौटुंबिक अडचणी घेऊन येत. बाबा त्यांना योग्य सल्ला देऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करीत. खूप कुटुबाना त्याचा लाभ मिळाला. कोणतीही देणगी ते घेत नसत. शारीरिक आजारावरील उपचारांसाठी ते डॉक्टरांकडे पाठवीत.
दयानंद बाबांनी हिमालयाच्या पायथ्याशी बसून तपश्चर्या केली होती. बाबा साईबाबांचे आणि विठोबा-रुक्मिणीचे परमभक्त होते. दयानंद बाबांना संगीताची आवड होती. नित्यनियमाने त्यांच्या छोट्या घरगुती मठात भजनाचे कार्यक्रम होत असत. एक संगीत शिक्षक त्यांच्याकडे यायचे ज्यांच्याकडे मी तबला वाजवायला आणि गाणे शिकायला जात असे.
१९८१ साली छोट्याशा जागेत माझे पहिले हॉस्पिटल उभे राहिले. १९९०-९३ या काळात मी तीन मजली इमारत उभी करून त्यात हॉस्पिटल सुरू केले. माझे घर त्याच वास्तूत तिसऱ्या मजल्यावर होते. हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या काळात काही अडचणी येऊ लागल्या. काही लोकांचे मत होते की या जागेत दोष आहे. माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण काही गोष्टी आकलनापलीकडच्या असतात, हे खरे.
या संदर्भात मी दयानंद बाबांशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले काही धार्मिक विधी व्यवस्थित झाले नाहीत. ते विधी करायला सांगितले. अमावस्येच्या रात्री बारा वाजता बाबांनी ते विधी पार पाडले. त्यावेळी माझ्यासोबत माझे गुरुबंधू आणि समाजसेवक मित्र संदेश जाधव होते. त्या विधींनंतर माझा मानसिक ताण कमी झाला. मी जोमाने, कोणतेही दडपण न घेता काम करू लागलो आणि त्याच जागेत माझी खूप भरभराट झाली. आज त्याच जागेवर मी त्यापेक्षा मोठी वास्तू उभारली आहे. त्याकरिता परमेश्वराचे खूप-खूप आभार.
सौ. शैलजा प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेशी जोडली गेली आहे. त्या संस्थेची साधारणतः ३५ वर्षांपासून ती विद्यार्थिनी आहे. मी तिच्याबरोबर डॉक्टरांच्या कॉन्फरन्ससाठी माऊंट आबूतील त्यांच्या 'पांडव भवन' या भव्य वास्तूत तीन वेळा गेलो आहे. त्यावेळच्या मुख्य प्रकाशमणी दादींना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याचे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला मिळाले. अशा संतमहंतांचे सान्निध्य आणि सहवासामुळे नकळतपणे आपल्याला एक अनामिक प्रगल्भता प्राप्त होऊ लागते. त्यांच्याकडून लाभणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळेच सन्मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत राहिला. या सर्व संतांना साष्टांग दंडवत !