बनगरवाडीचे रसग्रहण

कादंबरीच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत वाहत असलेली 'बनगरवाडी-मास्तर' य संबंधांची कथा ही या कादंबरीतील प्रमुख धारा असली तरी ती या कादंबरीच्या केंद्रस्थानी नाही. ती या कादंबरीतून साकार होणाऱ्या ग्रामव्यवस्थेच्या चित्राचा प्रमुख भाग आहे अन्य काही घटना आणि कथा मास्तरच्या कथेला स्पर्श करत आणि स्वतंत्रपणे विकणिन होत या ग्रामव्यवस्थेचे एक अर्थपूर्ण चित्र साकार करतात.

माणसाने आपल्या सोयीसाठी ही ग्रामव्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे या ग्रामव्यवस्थेचा घटक असलेला प्रत्येक माणूस तिला जपतो. तिच्यावर होणाऱ्या अन्य व्यवस्थांची आक्रमणे परतवून लावतो. ती टिकावी म्हणून माणसाच्या वर्तनासंबंधी, त्याच्या आपसांतील संबंधांविषयी त्याने एक संकेतव्यवस्था घडवली. तिच्या नियंत्रणाखाली या ग्रामव्यवस्थेतील माणसे वर्तन करतात. माडगूळकरांनी जर या संकेतव्यवस्थेप्रमाणे वागणारी माणसे रंगवली असती तर त्यांना केवळ प्रातनिधिक रूप प्राप्त झाले असते. परंतु माणसाच्या विवक्षित रूपात माडगूळकरांना रस आहे. त्यामुळे त्यांची माणसे या ग्रामव्यवस्थेतील संकेतांचे कधी पालन करत, कधी त्यांना मुरड घालत, तर कधी त्यांच्याविरूद्ध द्रोह करत जगतात. या माणसांच्या वैयक्तिक प्रेरणा आणि त्यांचो सार्वजनिक संकेतव्यवस्था यांत कधी संवादी, कधी विपरीत, तर कधी विरोधी ताण निर्माण झालेले असतात. माडगूळकर या सर्व गोष्टींसह बनगरवाडीतील माणसे उभी करतात. माणसाच्या वर्तनाला आणि मनोवस्थांना आकार देणारी मुख्य शक्ती ही ग्रामव्यवस्था असल्यामुळे या व्यक्तींच्या चित्रणातून आपणांस या ग्रामव्यवस्थेचा प्रत्यय येतो.

या पारंपरिक ग्रामव्यवस्थेत कुठलीही नवी गोष्ट शिरू द्यायची नाही यासंबंधी ही माणसे दक्षता बाळगतात. तिच्यात शिरू पाहणारी नवी गोष्ट धोकादायक असू शकेल, अशी यामागे भावना असते. म्हणूनच मास्तरच्या वागण्याबोलण्यावर ही माणसे नजर ठेवतात. शाळेसारख्या, या व्यवस्थेच्या दृष्टीने अनावश्यक असलेल्या गोष्टीला ते विरोध करतात. "साळा चालतीय कुटं  हतं? पोरं हायबी कुटं वाडीत" अशी गावकर्‍यांची शाळेबद्दल प्रतिक्रिया आहे. 'गावात तालीम बांधू या' या मास्तरच्या प्रस्तावावर 'तालीम बांधायला कुटं पहिलवान हायेत गावात?' अशी प्रतिक्रिया दिली जाते. ग्रामव्यवस्थेची परंपरेने चालत आलेली घडी टिकवायची. या व्यवस्थेच्या चौकटीत न बसणारी गोष्ट तर अजिबात स्वीकारायची नाही. तिच्याशी सुसंगत ठरू शकणाऱ्या नव्या गोष्टीही अगदीच नाईलाज झाला तरच स्वीकारायच्या किंवा अशा गोष्टी अधिक फायदेशीर असल्याची खात्री पटल्यावर त्या स्वीकारायच्या हे या ग्रामव्यवस्थेत वर्तनाचे एक सूत्र आहे. गावात तर तालीम बांधली गेली तर प्रचलित ग्रामव्यवस्थेला कसलाही धक्का पोचला नसता. असे असूनही या कल्पनेचे थंडे स्वागत गावकरी करतात. सर्वांसाठी शाळा ही तर या व्यवस्थेला विरोधी अशीच गोष्ट आहे. लिहिता-वाचता येणे हे या व्यवस्थेतील ठरावीकांचे काम; इतर जण जी कामे करतात त्यात लिहिण्या-वाचण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे त्यांना लिहिणे-वाचणे शिकण्याची गरज नाही. या उप्पर जर एखादा लिहायला-वाचायला शिकला तर तो परंपरेने चालत आलेले काम करणार नाही. त्याला 'पांढरे कपडे घालून हिंडायचा नाद लागतो,' तो कामातून जातो. आता जर सरकारने शाळा काढल्याच आहेत तर थोडेबहुत शिकावे, आपापले उद्योग करण्याइतपत मोठे झाले की शाळा विसरून आपापल्या उद्योगधंद्याला लागावे, अशी या पारंपरिक ग्रामव्यवस्थेची शिक्षणाबद्दल भूमिका आहे. म्हणूनच मास्तरच्या पहिल्या भेटीत सरकारने या गावाला मास्तर पाठवण्याबद्दल दादू बालट्या म्हणतो, 'हं, हतं काय करायचा गा मास्तर ?... रिक्कामा फाजीलपणा.'

पुस्तकः सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी
लेखकः सुधीर रसाळ