साठोत्तरी मराठी कादंबरीतील पर्यावरणीय अनुभवाचे स्वरुप

 मराठी कादंबरी: सृष्टी आणि दृष्टी 

डॉ. सुहास पुजारी

साठोत्तरी मराठी कादंबरीतील पर्यावरणीय अनुभवाचे स्वरुप

लेखकः अनंत मनोहर पुस्तकः अरण्यकांड (मौज प्रकाशन)

जंगलनाशाचे अनेक संदर्भ 'अरण्यकांड' मध्ये विखुरले आहेत. जंगल जगले पाहिजे ही मनोहरांची प्रेरणा त्यामागे दिसते. पर्यावरणाच्या रक्षणाचे मूल्यभान त्यांना आहे. त्यामुळे ललितकृतीत देखील अनेक संदर्भाची ते जाणीवपूर्वक पेरणी करतात. निवेदनाच्या ओघात येणारे हे तपशील पहा, "आता जंगल तुटत चालले. कबिनी, नुगू, लिंगनमक्की, भद्रा, काळीनदी या योजनांमुळे जंगलाचा संकोच झाला. दांडेलीला पेपरमिल आली. या कारखान्यामुळे अमाप वृक्षतोड झाली. नव्या वस्तीसाठी जंगल आणखी आखडले. हत्तींची तर कत्तल चालल्येय. नुसत्या १९८२ ते १९९२ या दहा वर्षांत चोर-शिकाऱ्यांनी सुळेवाले एकशे सव्वीस नर हत्ती पाडले आणि आता मोठे हत्ती मिळत नाहीत तर ते सुळेवाल्या तरण्या व लहान हत्तींचीही शिकार करतात. पूर्वी पाच माद्यांमागे दोन नर असे प्रमाण होते, त्यामुळे हत्तींची संख्या वाढत होती. आता हे प्रमाण शंभर माद्यांमागे एक नर एवढे कमी झालेय." (अरण्यकांड, पृ. १२६-१२७) विकासाच्या विविध योजनांमुळेही पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. 'अरण्यकांड' ला कर्नाटकातील अगुंब्याच्या जंगलाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कर्नाटकातील विकास योजनांचा परिणाम तिथल्या पर्यावरणावर व जंगलक्षेत्रावर कसा होत आहे, याचे संदर्भ'अरण्यकांड' मध्ये येतात.

'अरण्यकांड' मधून व्यक्त होणारे हे वन्यपशूंच्या हत्येचे, ऱ्हासाचे वास्तव चित्र तथाकथित मानवी संस्कृतीला खाली मान घालायला लावणारे आहे."... अगदी पंधरा वर्षांपूर्वीही, हत्तींच्या कळपाचा फोटो काढायचा झाला तर कळप चार हत्तींचा असला तरी त्यांत एखादा तरी सुळेवाला नर असायचाच. आज मात्र तीस-तीस, चाळीस-चाळीस हत्तींच्या कळपांत एकसुद्धा सुळेवाला नर दिसत नाही ... मोठा नर तर सोडाच, सुळेवाला छोटा नरही दिसत नाही चटकन." (अरण्यकांड, पृ.१२६-१२७) मानवाच्या हव्यासापोटी घडणारी हत्तींची शिकार अथवा हस्तिदंतासाठी घडणारे हे क्रौर्य अवघ्या जीवनालाच विरूपतेकडे नेणारे आहे. अरण्यसंपत्तीचे हे पुनर्भरण मानवाला कधीतरी शक्य होईल का, असा प्रश्न हे निवेदन आपल्यासमोर ठेवते.

आकडेवारीसह येणारे तपशील आणि मूळ समस्येमागचे  अर्थनिर्णयन पर्यावरणीय भान जागृत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. वन्य अथवा जलीय जीवांची होणारी शिकार व त्यामागची कारणमीमांसा पुढील निवेदनातून कशी व्यक्त होते. ते लक्षणीय आहे. "राहण्यासाठी जागा, अधिकाची हाव, बेपर्वा वृत्ती, संहाराची म्हणजे शिकारीची अमानुष क्रीडा आणि कायदा अमलात आणण्यात होणारी कुचराई या पाच कारणामुळे वाइल्ड लाइफ आणि वनस्पतीचं भयानक नुकसान झालं. याची उदाहरणं म्हणजे देवमासा, हत्ती आणि गेंडे, मांस, तेल आणि इतर पदार्थ यांसाठी मानवानं गेली दोनशे वर्षं देवमाश्यांची क्रूर हत्या केली. एकेकाळी आफ्रिका खंडात एक कोटी हत्ती होते. आता त्यांतले जेमतेम पाच लक्ष हत्ती शिल्लक असतील. केनियामध्ये नळ्याण्णव टक्के गेंड्यांचा संहार झाला. भारतात १९७० मध्ये असलेल्या सत्तर हजार गेंड्यांपैकी आता जेमतेम हजार गेंडे उरले आहेत." (अरण्यकांड, पृ. ९०) हे आपल्या देशातील आणि विदेशातील पर्यावरणाचे दुर्दैवी आणि विनाशकारी वास्तव 'अरण्यकांड' मधून प्रकटले आहे.

इस्राएलमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या मित्राच्या तोंडचे भारतातील पर्यावरणीय नतद्रष्टपणाविषयीचे उद्‌गार पीटर लोबो व्यक्त करतो. ते असे, "आमच्या ताब्यात इस्राएलची भूमी आली तेव्हा ते नुसतं वाळवंट होतं. आम्ही तिथं वाळवंटात जगतील अशी झुडपं लावली. त्यांनी आपल्या मुळांशी वाळू धरून ठेवली. त्यांचं भूमीत रूपांतर केलं. त्यातून आम्ही शेतं तयार केली, बागा उठवल्या. झाडं वाढवली. देवानं ब्राझिल, आफ्रिका, भारत यांना अमाप वृक्षसंपत्ती आणि भूमी दिली; तर हे देश बेसुमार जंगलतोड करून सुवर्णभूमीचं वाळवंटात रूपांतर करताहेत. तुमची भूमी आम्हाला लीजवर पन्नास वर्ष द्या. आम्ही सगळ्या जगाला धान्याचा, फळा-फुलांचा पुरवठा करू, कसली कसली झाडं आणि औषधी वनस्पत्या यांचा संहार केलात तुम्ही. तैमुरलंग आणि नादिरशहा तुमच्या क्रौर्यापुढं लाजतील..." (अरण्यकांड, पृ.८९) या सर्व पर्यावरणनाशाच्या संदर्भांनी 'अरणयकांड' अस्वस्थ करते. अधूनमधून काहीशी अशी 'रिपोर्टाज' शैलीत पुढे सरकणारी ही ललितसुंदर कादंबरी पर्यावरणीय प्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावते.