मराठी संशोधन पत्रिका (एप्रिल - सप्टेंबर २५)
आलोचनेचे सांस्कृतिक कार्य
(आलोचनेला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने प्रसिद्ध झालेल्या संवादिनी या स्मरणिकेतील लेख)
चंद्रकांत बांदिवडेकर
आज विज्ञानाच्या साहाय्यानें प्रगति करून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वच देशांपुढे एक फार मोठे सांस्कृतिक संकट उभे आहे. विज्ञानाच्या पोटांतून निर्माण होणाऱ्या टेक्नॉलॉजीनें इतकें अवाढव्य स्वरूप प्राप्त करून घेतलें आहे की, हा भस्मासुर प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचीच राखरांगोळी करून टाकतो आहे असे नाही, तर समाजाच्या विकासाची सर्वच बाजूनें कोंडी करील असें लक्षण अत्यंत प्रगत देशांतूनहि दिसूं लागलें आहे. एका बाजूनें कांहीतरी भव्य व विराट करण्याच्या आकांक्षांनीं पछाडलेला अमेरिकन समाजांत माणसाच्या व्यक्तित्वाचा, त्याच्या स्वातंत्र्याचा लोप होऊं लागलेला आहे व तो एकमेकाला न ओळखणाच्या, न समजावून घेऊं शकणाऱ्या बिनचेहऱ्याच्या माणसांच्या गर्दीचें स्वरूप प्राप्त करून घेऊ लागला आहे. विज्ञान व टेक्नॉलॉजीच्या विकासाच्या बळावर अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या कर्तृत्वानें स्वत्व विसरून त्या मार्गानें जाणाऱ्या समाजांवर आज ना उद्यां हे संस्कृतिविनाशाचे व आत्मभान विसरून सर्व बाजूनें धक्के खाणाऱ्या माणसांच्या समूहाचे रूप प्राप्त होण्याचें संकट वेगानें येत आहे. याच जोडीस भारतांत लोकशाही स्वरूपाच्या राज्यव्यवस्थेचें व समाजव्यवस्थेचें ध्येय ठेवलेलें आहे. लोकशाहींत प्रत्येक माणसाच्या व्यक्तित्वाची प्रतिष्ठा हें प्राणभूत तत्त्व असलें, तरी संस्कृतिरहित व संस्कारविहीन समाजांत या लोकशाहीचीं कटु फळें प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते. हीं कटु फळे म्हणजे राजकीय दारुण वंचना. त्याचबरोबर जनता हें सर्वच चांगल्या गोष्टींचे, मूल्यांचे व ध्येय धोरणांचे निर्मिति-क्षेत्र आहे, जनता जनार्दन आहे, असा एक अपसमज निर्माण होतो. या अपसमजांतूनच जनतेला जें हवें तेंच योग्य म्हणून तेंच द्या असा आग्रहहि होतो. इथूनच सर्वच मूल्यांचा गोंधळ सुरू होतो. जें जनतेंला हवें ते देण्याच्या विचारांतून जो लोकशाही लोकानुनय सुरू होतो त्यांतून सर्वच 'पॉप्युलर' गोष्टींना या ना त्या रूपानें राजकीय आश्रय मिळतो. यांतून सांस्कृतिक मूल्यांचें जतन करण्यासाठीं धडपडणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाविषयीं एक प्रकारची अनावडच नव्हे, तर तिरस्कारबुद्धि निर्माण होते. अशा समाजाच्या सांस्कृतिक कार्यासाठीं लोकाश्रय नाहींसा होतो आणि राजाश्रय देण्याचें शासनाला फारसें प्रयोजनच नसतें. एवढेच नव्हे, तर ही सांस्कृतिक मूल्यांचे जतन करू पाहणारी मंडळी लोकदृष्ट्या अव्यवहारी व वेडी ठरत असतात. या सर्वच प्रक्रियेत भर घालणारी एक घटना म्हणजे शिक्षणाच्या सार्वत्रिकतेचा शासनाचा प्रयत्न. लोकशाही काय किंवा सार्वत्रिक शिक्षण काय दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत, असे कोणीच म्हणू शकणार नाहीं. पण त्यांची एक धोकादायी बाजू असते व ती यांचा अर्धवट व्यापार करणाऱ्या समाजात फार घातक ठरू शकते याची पुरेशीं दखल शासनकर्त्यांनीं व लोककल्याण करणारांनी नेहमींच घेतली पाहिजे व या घातक बाजूंचा प्रभाव शक्य तों कमी व्हावा म्हणून अल्पसंख्यांकांच्या सांस्कृतिक प्रयत्नांची बूज सतत राखली पाहिजे. सार्वत्रिक शिक्षणाच्या पातळ पण सर्वव्यापी प्रवाहामुळे कला, ललित साहित्य, सांस्कृतिक (?) कार्यक्रम, यासंबंधी अर्धवट जिज्ञासा निर्माण होते व आपली पातळी गाठण्याच्या पाण्याच्या गुणधर्माप्रमाणे समाज आपली जिज्ञासा व भूक कला व साहित्य यांच्या सुलभ, सहज पचणाऱ्या, फारसे बौद्धिक परिश्रम न करतां मजेत वेळ घालवतां येण्याचे साधन बनणाऱ्या कथांना आश्रय देतो. आठ तासांचा कामाचा दिवस तंत्रविध्ये तंत्रविद्येच्या विकासामुळे शक्य झाला व मिळालेल्या पु फुरसतीचा उपयोग कसा करावा, ही समस्या निर्माण झाली. शारीरिक व मानसिक (फारसे सर्जनशील नसलेले) परिश्रम केल्यावर विरंगुळा म्हणून कांहीहि करण्याचा अधिकार सहजपणे मान्य होतो. समाजाच्या या गरजा भागविण्यासाठी रेडिओ, दूरदर्शन, पॉकेट बुक प्रकाशनें, भानगडी व सनसनाटी बातम्यांवर पोसणारी नियतकालिके पोसणारी नियतकालिकें, लोकाभिरुचीस पोसणारी नृत्य, नाट्य, संगीत यांचीं भ्रष्ट रूपें, सामान्य जनतेच्या 'थ्रिल'च्या आकांक्षा पोसणारी व वाढवणारी रहस्यकथा, लैंगिक कथा, विज्ञानकथा, भूतपिशाच्च कथा, भडक व कलागुणशून्य जाहिरातीच्या पातळीवरचीं चित्रे, या सर्वांतून एक गर्दीची संस्कृति (?) जोपासली जाते व तीत अस्सल व शुद्ध स्वरूपाची समाज-संस्कृति विरून जाऊं लागते. ही प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची व आश्चर्य वाटावे इतकी शक्तिशाली असते की, मोठ्या मोठ्या विचारवंतांनाहि ती पचवू शकते. गर्दी बघितल्यावर गर्दीला आवडणाऱ्या कोपरखळ्या व फिरक्या घेणारे, मुद्द्यांपेक्षां गुद्द्यांवर उतरणारे, तिरकसपणे बोलून गुदगुल्या करणारे, समाजांत बौद्धिक व वैचारिक वातावरण जिवंत ठेवणाऱ्या कांहीं थोडक्या विद्वानांची टिंगल करीत अज्ञानवंताची लोकांना रुचणारी पण छद्मी मुद्रा धारण करणारे, मैदानमारू व सभाजितसिंह वक्ते या गर्दीच्या संस्कृतीला बळी पडलेले असतात. लोकानुनय केवळ राजकीय स्वार्थासाठीं राजकीय नेतेच करतात असे नव्हे, तर प्रतिष्ठित लेखक-धुरीणहि करीत असतात.
या गर्दी-संस्कृतीचे भवितव्य काय असेल तें असो. जें घडत जातें तें अटळच आहे व त्यापुढे मान तुकवूनच लव्हाळी जिणें जगणें भाग आहे, अशी माणसांची वृत्ति मोठ्या प्रमाणावर बनत आहे. या सर्वव्यापी सांस्कृतिक विनाशाचा सामना करणारी काही मोजकी मंडळी असतात. कांहीं मोजक्या संस्था असतात. यांतील कांहींना आपल्या अंतिम पराजयाची कल्पना असते. पण ते अभिमन्यु वृत्तीनें चक्रव्यूहाचा भेद करीत आंत जात असतात कांहींच्या ठिकाणी बळकट आशावाद असतो. त्यांत कदाचित अननुभवीपणाचा उत्साहहि असण्याची शक्यता असते. या थोडक्या मोजक्या प्रयत्नांत 'आलोचने' सारख्या निष्ठेनें, जिद्दीने व त्यामानाने चालविलेल्या प्रयत्नाचा समावेश करावा लागेल. 'आलोचने'च्या या व्यापाचा विचार करतां हे मासिक तडजोड न करतां वीस वर्षे चाललेंच कसें याचें आश्चर्य वाटावें. खरोखर एका बाजूला भडक, सनसनाटी 'व्हल्गर' रुचि पोसणारी नियतकालिकें व दुसऱ्या बाजूला 'आलोचने' सारखे मासिक यांचा विचार केला, तर 'आलोचना' चालवणाऱ्या व त्यासाठी लिहिणाऱ्या लेखकांचा कितीहि गौरव केला, तरी तो थोडाच आहे. एकूण आजच्या साहित्यिक परिस्थितींत (वाचकवर्गाची आवड, संख्या, लोकप्रिय कला व साहित्यप्रकारांचे वाढतें पीक, दर्जेदार साहित्याचा मोबदला मिळण्याची अशक्यता इ.) चांगले साहित्य कां लिहिले जात नाहीं याची चिंता करतांना जें थोडेसें मोजके साहित्य निष्ठेनें लिहिलें जाते आहे ते कसे निर्माण होतें याचेच आश्चर्य वाटावें अशी एकूण स्थिति आहे. म्हणूनच सांस्कृतिक ऱ्हासाच्या व विनाशाच्या छायेखाली 'आलोचने'ने वीस वर्षे दिलेला जीवनमरणाचा मूक लढा फार महत्त्वाचा व मोलाचा वाटतो.